दरवाढीमुळे मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनीं वाटले पेढे : बटाट्याचा भाव क्विंटलला स्थिर
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा भाव पुन्हा प्रति क्विंटलला 1000 रुपयांनी वधारला तर रताळ्याचा भाव क्विंटलला 200 रुपयांनी कमी झाला. बेळगाव जवारी बटाटा, इंदूर बटाटा आणि आग्रा बटाट्याचा भाव क्विंटलला स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्याच्या आवकेत तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे किंचित प्रमाणात दरवाढ होत आहे. कोथिंबीर, कांदा पात यांच्या दरात घसरण झाली आहे तर टोमॅटो दरात हळूहळू वाढ होत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून कांदा दराने गरुडझेप घेत प्रत्येकी बाजारात कांदा दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी मार्केट यार्डमध्ये कांदा भाव क्विंटलला सुमारे 4000 ते 6500 रुपये झाला. यामुळे खानावळ, मेस, हॉटेल, बारमधून सलाड रुपात देणारा जादा कांदा गायब झाला आहे. त्याऐवजी गाजर, मुळा देण्यात येत आहे. कांदा दरात अचानक भरमसाठ वाढ होऊ लागल्याने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तर दुसरीकडे भाव वाढल्याने मार्केट यार्डमध्ये शेतकरी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करीत आहे.
देशभरातील बाजारपेठेमध्ये कांदा आवकेत दिवसेंदिवस घट निर्माण झाली आहे. यामुळे याचा कांदा दरावर परिणाम झाल्याने दर वाढतच आहे.
जानेवारीला नवीन कांदा आवक
सध्या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रातील साठवून ठेवलेला जुना कांदा थोड्या थोड्या प्रमाणात येत आहे. तर कर्नाटकातील नवीन कांदा आवक देखील सुरुवात होऊन दोन महिने झाले आहेत. यंदा पाऊस नसल्याकारणाने कर्नाटकातील कांदा उत्पादनात घट झाली आहे. तसेच गेल्या दोन-तीन वर्षापासून कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याकारणाने कांदा उत्पादक शेतकरी ऊस लागवडीकडे वळला आहे. यंदा कांदा उत्पादनात 60 टक्के घट निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील कांदा लागवड झाली असून जानेवारी महिन्यात कांद्याची आवक नवीन उत्पादनाला प्रारंभ होणार आहे. तोपर्यंत कर्नाटकातील नवीन कांद्यावर अवलंबून राहावे लागत आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
रताळ्याचा भाव 200 रुपयांनी कमी
बेळगाव, खानापूर तालुक्यातील रताळी आवक मार्केट यार्डमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाअभावी रताळ्याची क्वालिटी खालावली आहे. सध्या काही रताळ्यांना कीड व राळकीची लागण झाली आहे. तसेच परराज्यातील बाजारपेठेमधून मागणी कमी झाली आहे. बाजारामध्ये शनिवारी सुमारे 12 हजार पिशव्या आवक झाली होती. यामुळे रताळी भाव क्विंटलला 300-1000 रुपये झाला आहे व 200 रुपये भाव कमी झाला आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
जवारी, आग्रा, इंदूर भाव स्थिर
जवारी बटाट्याची आवक सुरू आहे. लाल आणि काळ्या जमिनीतील बटाटा आवक मार्केट यार्डमध्ये येत आहे. या बटाट्याला बेळगाव जिल्ह्यासह गोवा, कारवार, कोकणपट्टा व परराज्यामध्ये मागणी आहे. तसेच इंदूर बटाटा आवक अंतिम टप्प्यात आहे. इंदूर नवीन बटाटा आवकसुद्धा जानेवारी महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
भाजी मार्केटमध्ये पावसाअभावी भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही भाजीपाल्याचा भाव स्थिर आहे असून काही मोजक्या भाजीपाल्याचा भाव किंचित वाढला आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिला.









