एबीव्हीपीची मागणी : बसस्थानकात ठिय्या आंदोलन : विभागीय नियंत्रणाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर
प्रतिनिधी/ बेळगाव
शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असली तरी विद्यार्थ्यांना अपुऱ्या बसेसमुळे शाळा, महाविद्यालयांना जाणे कठीण बनत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. एकतर बसेस नाहीत दुसरी आली तरी वेळेवर येत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी पुरेशी बससेवा पुरविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (एबीव्हीपी) करण्यात आली. याबाबतचे निवेदन वरिष्ठ विभागीय नियंत्रणाधिकारी राजेश हुद्दार यांना देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात यावे लागते. मात्र त्यांना बसेसची समस्या भेडसावत आहे. राज्य सरकारने शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची घोषणा केल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे वर्गामध्ये उपस्थित राहणे कठीण झाले असून, काहीवेळा वेळेवर परीक्षेला जाणेही कठीण होत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे.
बेळगाव शहरात बसवण कुडची, वंटमुरी, कणबर्गी, खानापूर तालुक्यातील गावे, हलगा, संकेश्वर, मुतनाळ, बिडी, गण्sाशपूर आदी अनेक गावांतून शहरात येण्यासाठी अपुऱ्या बसेसमुळे समस्या निर्माण होत आहे. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी बसेसची संख्या वाढवावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेस उपलब्ध करून द्याव्यात. जसे महिलांना मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे मुलांनाही मोफत प्रवासाची मुभा देण्याचीही मागणी केली.
प्रारंभी एबीव्हीपीच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानकात बसेस सोडण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. विभागीय नियंत्रणाधिकारी राजेश हुद्दार यांनी विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या बसेसची समस्या सोडवून बसेसची संख्या वाढविण्याचे आश्वासन दिले.
हलगा येथील विद्यार्थिनी आक्रमक
हलगा येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. मात्र अपुऱ्या बसेसमुळे अडचणी निर्माण होत असून शिक्षणावर परिणाम होत आहे. जरी बस आली तरी वेळेवर येत नाही. यामुळे वेळेवर वर्गात जात येत नाही. परिवहन मंडळाने जर पुरेशा बससेवा पुरविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हलगा येथील विद्यार्थिनींनी यांनी दिला.









