
प्रतिनिधी /पणजी
‘लोकोत्सव 2023’ साठी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर फुटबॉल मैदानावर विक्र्रेत्यांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यासाठी करोडो रुपये खर्च करून खास मंडप उभारण्यात आला आहे. परंतु या भव्य मंडपात साधी पंख्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तेथील स्टॉलधारकांसह ग्राहकांनाही प्रचंड उकाड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कला आणि संस्कृती संचालनालय आणि पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळानंतर तीन वर्षांनी कला अकादमी परिसरात करोडो रुपये खर्च करून लोकोत्सवाचे आयोजन केले व याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकोत्सवासाठी अंदाजे 500 स्टॉल्स विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्टॉल्सचे वाटप करताना कला आणि संस्कृती संचालनालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्वीच घोळ घालून ठेवल्यामुळे बऱ्याच विक्रेत्यांना स्टॉल्स मिळत नसल्याने निरूत्साही होऊन परतावे लागले.
स्टॉल्सचा लॉट काढण्यासाठी अर्ज भरलेल्या विक्रेत्यांना अमुकच दिवशी उपस्थित राहण्याचा संदेश पाठविण्यात आला होता. त्यामुळे संस्कृती भवनात बरीच गर्दी झाली होती. कला अकादमी परिसरातील अंदाजे 200 चांगल्या जागेतील स्टॉल्स पूर्वीच मंत्री, अधिकाऱ्यांच्या वशिल्याने देण्यात आले होते. त्यामुळे काही व्यापाऱ्यांना या संधीला मुकावे लागले. बरेचसे गोमंतकीय स्वयंसाहाय्य गटांना तसेच इतर विक्रेत्यांना खास उभारण्यात आलेल्या मंडपातील स्टॉल्स देण्यात आले. मंडप उभारताना त्यात वातानुकूलित यंत्रणेचे नियोजन करावे लागते. अशा मंडपात फॅन घालणे धोकादायक असते त्यामुळे एकतर जमिनीवर ठेवता येतील असे फॅन उपलब्ध करून देण्याची सोय करावी वागते परंतु या मंडपामध्ये भाड्यापोटी हजारो रुपये दिलेल्या स्टॉल्सधारकांना फॅनची सोय उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने गेले पाच दिवस उकाड्याने विक्रेते आणि ग्राहक हैराण झाले आहेत.









