सर्व्हरडाऊन, एकाच काऊंटरमुळे पैसे भरण्यासाठी मोठी रांग : समस्या त्वरित सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार सुधारण्यासाठी कोरोना काळापासून प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांच्यावर ही जबाबदारी दिली होती. त्यांनीही येथील परिस्थिती पाहून हात जोडले होते. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत रुग्णांची नावे नोंदविण्यासाठी, वेगवेगळय़ा सेवांचे शुल्क भरण्यासाठी गर्दी झाली होती. मुख्य इमारतीत पुरेसे काऊंटर आहेत. हे काऊंटर दुपारी 4 वाजता बंद होतात. त्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुल्क भरण्यासाठी आपत्कालीन विभागात पाठविण्यात येते.
सोमवारी आठवडय़ाचा पहिला दिवस. उपचारांसाठी येणाऱया नव्या रुग्णांची गर्दी असते. किमान गर्दीच्यावेळी तरी जादा काऊंटर सुरू करून रुग्णांची सोय करायची असते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाहीत, अशी स्थिती आहे. आपत्कालीन विभागात उपचारासाठी येणाऱया रुग्णांची नावे नोंदवून त्यांचे केसपेपर बनविण्याबरोबरच पैसे भरून घेण्याचे कामही तेथील कर्मचाऱयांना करावे लागते. कारण हा एकच काऊंटर 24 तास सुरू असतो. सोमवारी सायंकाळी झालेला सर्व्हर डाऊन व अपुऱया काऊंटरमुळे पैसे भरण्यासाठी आपत्कालीन विभागात मोठी रांग लागली होती. या विभागाच्या खिडकीपासून सिटीस्कॅनपर्यंत ही रांग होती. अनेकांनी ‘तरुण भारत’शी संपर्क साधून यासंबंधी आपली व्यथा मांडली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी जादा काऊंटरची व अतिरिक्त कर्मचाऱयांची सोय करण्याची मागणी केली जात आहे. कारण शुल्क भरल्याशिवाय आवश्यक सेवा दिली जात नाही. पैसे भरण्यास होणाऱया विलंबामुळे रुग्णांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. बिम्स प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.









