मुतगे गावाला स्वतंत्र-जादा बसफेऱ्या सोडण्याची मागणी
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे दररोज सकाळी आठ ते नऊच्या सुमारास बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची व नोकरदार वर्गाची गैरसोय होत आहे. त्यासाठी गावाला स्वतंत्र बस सोडावी. तसेच या मार्गावर जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थी वर्ग व नागरिकांतून होत आहे. येथून दररोज शिक्षणासाठी बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच कामानिमित्त बेळगाव शहराला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्याही जास्त आहे. मात्र सकाळी आठ ते नऊ या दरम्यान पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी येथून येणाऱ्या बसेस न थांबताच बेळगावकडे जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथे बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे. सध्या शासनाच्या महिलांसाठी असलेल्या मोफत बस योजनेचा फटका विद्यार्थी व इतर नागरिकांना बसत आहे. पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी, मावीनकट्टी या बसेस आधीच भरून येत असल्याने बसचालक मुतग्यासह इतर थांब्यावर न थांबताच बेळगावकडे जात आहेत. यासाठी राज्य परिवहन मंडळाने एक तर गावाला स्वतंत्र बस सोडावी किंवा बेळगाव-सांबरा मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे .
शक्ती योजनेमुळे बससेवा विस्कळीत
शासनाच्या महिलांसाठी सुरू असलेल्या शक्ती योजनेमुळे बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून याचा फटका विद्यार्थी वर्ग इतर प्रवाशांना बसत आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसात बससेवा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.









