तिन्ही बाजूला रांगा : चालकांचा हेकेखोरपणा नडला
वार्ताहर/मजगाव
खानापूर रोड, पिरनवाडी येथील छ. शिवाजी महाराज चौकादरम्यान बुधवारी सायंकाळी 6 च्या समारास वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे बराचवेळ वाहनांच्या तिन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. घाईगडबडीमध्ये चारचाकी आणि दुचाकी एकमेकाला समोरासमोर ठोकरल्यामुळे सदर प्रकार घडला. कोणाचेही फारसे नुकसान झाले नाही व दुखापतही झालेली नाही. मात्र दोन्ही चालकांच्या हेकेखोरपणामुळे वाहतुकीची कोंडी झाली. कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने आणि सायंकाळची वेळ असल्याने तिन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. काही वाहनधारकांनी समजूत काढल्यानंतर रस्ता खुला झाला आणि वाहतूक सुरळीत झाली. मात्र यावेळी एकही पोलीस तेथे उपस्थित नव्हता. छ. शिवाजी महाराज चौकात पूर्णवेळ एक वाहतूक पोलीस ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.









