पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न, दूध उत्पादनात घट
बेळगाव : वाढत्या उन्हाने तलाव, विहिरी, नदी-नाले, कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यातच वळिवाने हुलकावणी दिल्याने पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओल्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाल्याने पशुपालकांना फटका बसू लागला आहे. वाढत्या उष्म्याच्या तीव्रतेने ओला चारा सुकू लागला आहे. जिल्ह्यात मुबलक चारा साठा असल्याचा दावा पशुसंगोपन खात्याने केला आहे. मात्र सुका चारा मुबलक प्रमाणात असला तरी ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. काही भागात जनावरांना ओला चारा मिळत नसल्याने दूध क्षमतेवर परिणाम झाला आहे. शिवाय काही जनावरांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होऊ लागला आहे. पशुखाद्याच्या किंमती गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. अधीच ओला चारा मिळणे कठीण झाला आहे. त्यातच पशुखाद्याच्या किंमती वाढल्याने पशुपालकांसमोर चिंता निर्माण झाली आहे. जिल्ह्dयात ज्या ठिकाणी नदीकाठ आणि पाण्याची सोय आहे. त्याठिकाणी ओला चारा उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र बहुतांशी भागात ओल्या चाऱ्याची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी मका, जोंधळ, बाजरी, आदींची पेरणी केली आहे. त्यामुळे जनावरांना काही प्रमाणात ओला चारा मिळू लागला आहे. मात्र बहुतांश भागात पाण्याची तीव्रता जाणवू लागल्याने पाणी पिण्यासाठीदेखील वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे जनावरांचा ओल्या चाऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे.
जिल्हा प्रशासन -पशुसंगोपन खात्याने ओला चारा उपलब्ध करावा
जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा, गाढव, डुक्कर आदींचा समावेश आहे. यापैकी शेतकरी गाय, म्हैस आणि शेळ्या मेंढ्यांचे अधिक संगोपन करतात. मात्र या पाळीव जनावरांना आता ओला चारा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे गाय, म्हैस या दुभत्या जनावरांच्या दूध क्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे. जिल्हा प्रशासन आणि पशुसंगोपन खात्याने ओला चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पशुपालकांतून होऊ लागली आहे.









