रविवारी 26 लाख जणांनी भरला परतावा
नवी दिल्ली :
2023-24 आर्थिक वर्षासाठी आयटीआर फाईल करण्याचा 31 जुलै रोजी शेवटचा दिवस होता. 30 जुलै सायंकाळी 6 पर्यंत 6 कोटीहून अधिक जणांनी प्राप्तीकर परतावा (आयटीरिटर्न)भरला असल्याची माहिती मिळते आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आयटीआर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
रविवार 30 जुलैच्या सायंकाळी 6 पर्यंत 6 कोटीहून अधिक जणांनी आयटी रिटर्न फाईल केले होते. यापैकी 26 लाख 76 हजार जणांनी 30 जुलैला एका दिवसात आयटी रिटर्न भरला आहे. 1 कोटी 30 लाखहून अधिकजण रविवार 30 जुलै रोजी संध्याकाळी 6.30 पर्यंत आयटीआरसाठी पोर्टलवर लॉगइन झाले होते.
किती भरावे लागणार विलंब शुल्क
जर का आपण 31 जुलैची तारखेपर्यंत आयटी परतावा भरलेला नसेल तर 1 ऑगस्टनंतर विलंब शुल्क भरावे लागणार आहे. 5 लाखपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना यापुढे आयटीआर भरायचा झाल्यास 5 हजार रुपये जादा शुल्करुपी भरावे लागणार आहेत. पण उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असेल तर मात्र 1 हजार रुपये इतकेच विलंब शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.









