वित्तीय संस्थेची केली जातेय चौकशी : द्रमुकचे वरिष्ठ नेते वेलु अडचणीत
वृत्तसंस्था/ चेन्नई
प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूचे मंत्री ईव्ही वेलु यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी शुक्रवारी छापे टाकले आहेत. राज्याच्या विविध हिस्स्यांमध्ये वेलु यांच्या आर्थिक व्यवहारांविषयीचे दस्तऐवज तपासले जात आहेत. द्रमुकचे वरिष्ठ नेते असलेले वेलु यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे.
प्राप्तिकर विभागाने करूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. द्रमुकचे दिवंगत नेते वासुगी मुरुगेसन आणि वर्तमान मंत्री ईव्ही वेलु यांच्याशी निगडित अनेक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुरुगेसन यांची बहिण पद्मा यांच्या घरातही प्राप्तिकर विभागाने झडती घेतली आहे.
प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांनी तिरुवनमलाईमध्ये अरुणाई इंजिनियरिंग कॉलेजमध्ये देखील झडती घेतली आहे. या कॉलेजची स्थापना ईव्ही वेलु यांच्याकडून 1993 मध्ये करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांपूर्वी सीआयएसएफ अन् स्थानिक पोलीस परिसरात तैनात करण्यात आले होते. अशाचप्रकारे गांधीपुरम येथील एनेक्स फॅब्रिक्सशी संबंधित वित्तीय संस्थेच्या कार्यालयातही प्राप्तिकर विभागाने झडती घेतली आहे. करूर जिल्ह्यातील वयापुरी नगर भागातील व्यावसायिकाच्या घरावही छापा पडला आहे. द्रमुक नेते शक्तिवेल यांच्या घरातही कारवाई करण्यात आली.
उपकरणे उपलब्ध करविण्यासंबंधी तामिळनाडू वीज महामंडळाचे ठेकेदार आणि पुरवठादारांशी संबंधित अनेक ठिकाणी यापूर्वी छापे टाकण्यात आले होते. चेन्नईत सुमारे 10 ठिकाणी छाप्यांची कारवाई झाली होती. तर सप्टेंबर महिन्यात ईडीने राज्याचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले होते. बालाजी हे सध्या पैशांच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.









