अन्न-नागरी पुरवठा विभागाची कारवाई
बेळगाव : सरकारी नोकरांबरोबर आयकर भरणाऱ्यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर असूनदेखील कर्ज घेण्यासाठी आयकर भरणारे आता अडचणीत आले आहेत. खात्याने आमच्यासाठी नियम शिथिल करावा, अशी मागणीही सर्वसामान्य लाभार्थ्यांनी केली आहे. सरकारी नोकर, आयकर भरणारे, रेल्वे कर्मचारी यासह आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांनी बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांना कार्डे जमा करण्यासंबंधी खात्याने नोटीस दिली आहे. शिवाय वेळेत बीपीएल कार्डचे एपीएलमध्ये बदल करून न घेतल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.
मात्र विविध कामांसाठी आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्यांनी कर्ज घेतले आहे. अशावेळी जादा कर्ज घेण्यासाठी अधिक उत्पन्न दाखविणे क्रमप्राप्त आहे. मात्र अशा लाभार्थ्यांना बीपीएल कार्डे जमा करण्यासंबंधी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. को-ऑप. बँकमध्ये दोन लाखाहून अधिक कर्ज हवे असल्यास आयटी रिटर्न भरावे लागते. बहुतांश सर्वसामान्य लाभार्थ्यांनी कर्जासाठी आयटी रिटर्न भरला आहे. अशा लाभार्थ्यांना खात्याकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. परिस्थिती कमजोर असूनदेखील नोटिसा देण्यात आल्याने लाभार्थी नाराज झाले आहेत. खात्याने सर्वेक्षण करून सर्वसामान्य लाभार्थ्यांना या नियमात शिथिलता द्यावी, अशी मागणीही होऊ लागली आहे.









