प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडणे किंवा नोटीसा येथे असे प्रकार केवळ धनिकांच्या संदर्भात घडतात, अशी आपली समजूत आहे. ती बऱ्याच प्रमाणात योग्यही आहे. तथापि, उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे सदर व्यक्तीला तर आश्चर्याचा धक्का बसलाच, पण त्या परिसरातील बहुतेक सर्वच लोकांच्यावरही स्तिमित होण्याची वेळ आली. घडलेला प्रकार असा की, या जिल्ह्यातील पतरेगवा येथील एक व्यक्ती मेवा लाल यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस आली. मेवालाल हे अत्यंत धनहीन अवस्थेत आपले आयुष्य घालवित आहेत. ते एका चहाच्या दुकानात कपबशा विसळण्याचे काम करतात. त्यांच्याकडे या कामाशिवाय अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.
ते प्रतिदिन जे मिळवितात, त्यात कसाबसा त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा व्यक्तीला प्राप्तीकर विभागाची नोटीस येणे, हा त्यामुळेच मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. मेवालाल यांच्याकडे त्यांच्या मालकीचे एक छोटे घर आहे. पण त्या घरावरही काही लोकांनी बेकायदा कब्जा केल्याने त्यांना त्या घराचाही काही उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत मोठ्या जिकीरीने आपले पोट कसेबसे भरणाऱ्या मेवालाल यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस आली आहे. आता या नोटीसीचे काय करायचे हे त्यांना समजेनासे झाले आहे. ही प्राप्तीकर विभागाची नोटीस त्यांना ‘चुकून’ आली असावी, असा कयास आहे. त्यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या अन्य कोणत्यातील धनिक व्यक्तीच्य नावाने काढलेली नोटीस त्यांना मिळाली असावी असाही तर्क केला जात आहे. आता प्राप्तीकर विभागाच यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा केली जात आहे.









