जनतावादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष कटके यांच्यावर धाडसत्र
मुंबई / प्रतिनिधी
आयकर विभागाने कधी नाही ते प्रथमच सायनच्या झोपडपट्टीत धाड टाकल्याने एकच खळबळ माजली आहे. येथील झोपडपट्टीत राहणारे जनतावादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष कटके यांच्यावर हे धाडसत्र टाकले असून, याचा अधिक तपास सुरू आहे.
झोपडपट्टीतून चालणाऱया या पक्षाला जवळपास 70 ते 80 कोटी देणगी मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बुधवारी झोपडपट्टीत राहणाऱया संतोष कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला.
2014 मध्ये संतोष कटके यांनी पक्षाची स्थापना केली होती. 2014 ते 2022 या कालावधीत संतोष कटके यांच्या पक्षाला देणगी मिळाली आहे. आयकर विभागाला संशय होता की, संतोष कटके हा जनतवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होता. आयकर विभागाच्या अधिकाऱयांनी संतोष कटकेच्या घरासोबत चुनाभट्टी येथील कार्यालयावरही छापा टाकला. यावेळी संतोषसह त्याच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सकाळी 6 वाजताच्या सुमारास आयकर विभागाची टीम संतोषच्या सायन येथील घरी पोहोचली होती. सायन येथील ट्रान्झिट पॅम्पमध्ये संतोष कटके गेल्या 20 वर्षापासून राहत आहे. संतोषच्या चौकशीत अधिकाऱयांनी पक्षाशी संबंधित आयकराची कागदपत्रे, देणगीशी निगडीत व्यवहार, बिले मागितली. आतापर्यंत पक्षाने किती निवडणुका लढल्या. त्यावर किती खर्च झाला आणि खर्च केल्यानंतर किती पैसा उरला आहे. उरलेले पैसे कुठे आहेत असे विविध प्रश्न चौकशीत विचारण्यात आले. तर याचा अधिक तपास सुरू आहे.









