40 कोटींचा आयटी रिफंड घोटाळा उघड, अनेक कंपन्यांची चौकशी सुरू
वृत्तसंस्था /हैदराबाद
प्राप्तिकर विभागाने 40 कोटी ऊपयांचा कर परतावा घोटाळा उघडकीस आणत हैदराबाद आणि विजयवाडामधील आठ कर सल्लागार, अनेक रेल्वे व पोलीस विभागाचे कर्मचारी आणि अनेक तंत्रज्ञान कंपन्यांवर छापेमारी सुरू केली आहे. आयटी इन्व्हेस्टिगेशन विंगच्या अधिकाऱ्यांनी निजामपेठ, एलबी नगर आणि वनस्थलीपुरममधील विविध ठिकाणी गेले दोन दिवस छापे टाकत संशयास्पद कंपन्यांमधील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीनंतर आता संबंधित सरकारी अधिकारी आणि तांत्रिक व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 40 कोटी रुपयांच्या आयटी रिफंड घोटाळा प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणातील फसवणुकीचे जाळे मोठे असून हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्मयता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. फसवणुकीमध्ये गुंतलेल्या सल्लागार आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पुढील काही दिवस चौकशी सुरू राहणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये घडलेल्या अशाच एका प्रकरणात हैदराबाद सेंट्रल क्राईम स्टेशनने तपास हाती घेत सहभागी सल्लागार आणि कर्मचाऱ्यांविऊद्ध आरोपपत्र दाखल केले होते.









