► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अन्नगुणवत्ता आणि शुद्धता आयोगाचे सदस्यत्व भारताला प्रदान करण्यात आले आहे. कोडेक्स अॅलिमेंटरियस कमिशन (सीएसी) या नावाने हा आयोग ओळखला जातो. या आयोगाची निर्मिती संयुक्त राष्ट्रसंघाने केली असून ही संस्था जगातील प्रतिष्ठित संस्थांमधली एक आहे. भारताला या संस्थेचे सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव आयोगाच्या सर्व सदस्यांनी एकमुखाने संमत केल्याची माहिती देण्यात आली.
आयोगात भारताचा समावेश आशिया विभागाचा प्रतिनिधी या नात्याने करण्यात आला आहे. आयोगाच्या कार्यकारी समितीचे सदस्यत्व भारताला देण्यात आले असून ही समिती या आयोगाचे महत्वाचे अंग आहे. जागतिक अन्नगुणवत्ता निकष निर्धारित करण्याचे महत्वाचे कार्य हा आयोग करतो. आता भारतालाही या आयोगाचा सदस्य या नात्याने या निकष निर्धारण प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. भारताचे योगदान महत्वाचे असेल असे आयोगाचे मत आहे.
समितीत 17 सदस्य
या महत्वाच्या समितीत एक अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, सहा विभागीय समन्वयक आणि जगाच्या विविध विभागांमधून निवडण्यात आलेले सात प्रतिनिधी अशा एकंदर 17 जणांचा समावेश असतो. रोममध्ये सीएसीचे 46 वे अधिवेशन होत आहे. याच अधिवेशनात भारताची एकमताने निवड करण्यात आली आहे.









