प्रतिनिधी /बेळगाव
आर्थिक व्यवस्थापन किंवा गुंतवणूक कुठे व केव्हा करावी हा सर्वसामान्यांना न समजणारा विषय आहे. याबाबत सुशिक्षितांनाही तज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. आज याचे ज्ञान महत्त्वाचे असल्याने येत्या वर्षापासून कर्नाटकात कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसह सर्व अभ्यासक्रमात याचा समावेश केल्याचे आरसीयूचे कुलपती प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी सांगितले.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अकादमी, कर्नाटक उच्चशिक्षण परिषद बेंगळूर, आरसीयू आणि आरपीडी कला व वाणिज्य महाविद्यालय बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 26 रोजी ‘फायनान्शीयल एज्युकेशन अँड इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस’ या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आरपीडी महाविद्यालयाच्या के. एम. गिरी सभागृहात उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा नाईक होत्या. कर्नाटक उच्चशिक्षण परिषदेचे विशेष अधिकारी डॉ. एम. जयप्पा, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अकादमीचे मुख्य व्यवस्थापक रंगनाथन एस. आणि एसकेई संस्थेचे व्हा. चेअरमन प्रा. एस. वाय. प्रभू, आरसीयूचे प्रा. डॉ. सचिंद्र जी. आर., आरपीडी कॉमर्स विभागाचे समन्वयक प्रा. सुधीर शिंदे व्यासपीठावर होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात झाली.
प्रा. रामचंद्रगौडा म्हणाले, मी कॉमर्सचा प्राध्यापक असूनही
स्टॉक मार्केट किंवा इतर ठिकाणी फायदेशीर गुंतवणूक कशी करावी हे अध्यापनात कुठेही आलेले नाही, किंवा वैयक्तिकरीत्या मी स्वतःही गुंतवणूक केलेली नाही. कॉमर्सच्या प्राध्यापकाची ही अवस्था, तर इतरांचे काय? असा विचार करून नव्या अभ्यासक्रमात याचा समावेश व्हावा याकरिता मी शिफारस केली व येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात ‘फायनान्शीयल एज्युकेशन अँड इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस’चा समावेश केला.
डॉ. एम. जयप्पा म्हणाले, बँकिंग व गुंतवणूक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत, त्याची माहिती या अभ्यासक्रमामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना होईल. रंगनाथन एस. यांनी हा अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य रोल मॉडेल ठरले असून यातील ’सिस्टमॅटिक लर्निंग प्लॅन’मुळे विद्यार्थी हा विषय पूर्णपणे समजू शकतील व करिअरसाठीही उपयोग होईल. इतर राज्यातही हा अभ्यासक्रम लागू करण्याबाबत चर्चा सुरू असून लवकरच अंमलबजावणी होईल, असे ते म्हणाले.
प्रा. एस. वाय. प्रभू यांनी, आजकाल सरकारी नोकरीतील पेन्शन पद्धत बंद होत असल्याने योग्य आर्थिक व्यवस्थापन न केल्यास वृद्धापकाळात आर्थिक अडचणी उद्भवतील. त्याकरिता हा विषय सर्वांनीच शिकणे महत्त्वाचे आहे. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक म्हणाल्या, आर्थिक व्यवस्थापन गृहिणी ते व्यावसायिक सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सच्चिंद्र जी. आर. यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. सुधीर शिंदे यांनी करून दिला. प्रा. पूजा पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. संबंधित विषयावर दोन दिवस चर्चासत्रे होणार असून आरसीयूच्या संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापक सहभागी झाले आहेत.









