सिंधी पंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यात सिंधी समाज अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. मात्र या समाजाला सरकारकडून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. यासाठी राज्य सरकारच्या जात राजपत्रात हिंदू-सिंधी म्हणून समाविष्ट करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन श्री सिंधी पंचायत भवन यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. देशाची फाळणी झाल्यानंतर अनेक सिंधी बांधव देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांना सरकारच्या कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. आर्थिकरित्या सबल असणाऱ्या या समाजाने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. अनेकजण उद्योग व्यवसायात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात करही भरला जातो. सिंध प्रातांतून आलेल्या या समाजाला शासकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी सिंधी समाजाचा राज्याच्या जात राजपत्रात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. राजपत्रामध्ये जातीचा समावेश झाल्यास समाजातील मुलांना शासकीय योजनाचा लाभ घेणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण व इतर सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी कर्नाटक राज्याच्या जात राजपत्रात हिंदू-सिंधी जातीचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी राम जमनानी, संतोष वाधवा, जगदीश कपुरानी, नरेश गिडवानी आदी सिंधी बांधव उपस्थित होते.









