समाजबांधवांचे सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन
बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरी सविता समाजाला आपल्या हक्काचे आरक्षण मिळालेले नाही. सध्या 2ए प्रवर्गातून देण्यात आलेले आरक्षण रद्द करून प्रवर्ग 1 मध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुलबर्गा येथील सविता पीठ मठातर्फे सुवर्ण विधानसौध परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. सविता समाजातील नागरिक न्हावी, पुजारी व संगीतवादन क्षेत्रात कार्यरत आहेत. हा समाज मागासलेला समाज म्हणून ओळखला जातो. अनेक वेळा मागणी करून देखील समाजाला आरक्षण नसल्याने समाजातील तरुण शिक्षण तसेच नोकरीमध्ये मागे पडत आहेत. संपूर्ण राज्यात 12 लाखांहून अधिक सविता समाजाचे नागरिक कार्यरत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देऊन या समाजाचा उद्धार करावा, अशी मागणी गुलबर्गा येथील सविता पीठाचे प्रमुख सवितानंदनाथ स्वामीजी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
…तर राज्यभरातील सलून बेमुदत बंद
हुबळी येथून बेळगावच्या सुवर्णसौधपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्यभरातील शेकडो सविता समाजातील व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. सविता समाजाने राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील सलून बेमुदत बंद ठेवले जातील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी समाजाचे उपाध्यक्ष रमेश डी., गुरुनाथ राणेबेन्नूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.









