आमदार हलगेकर यांची मागणी : राज्य आपत्ती निवारणच्या सचिवांना निवेदन
खानापूर : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत खानापूर तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेंगळूर येथे राज्य आपत्ती निवारण विभागाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन देत तालुक्याच्या परिस्थितीची माहिती दिली. राज्य सरकारने नुकताच राज्यातील 156 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र बेळगाव आणि खानापूर तालुक्याला या यादीतून वगळले आहे. खानापूर तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना राज्य सरकारने खानापूर तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने तालुक्यावर अन्याय झालेला आहे. दुष्काळग्रस्त यादीत तालुक्याचा समावेश करावा, यासाठी आपत्ती निवारण विभागाने तालुक्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.









