कोल्हापूर प्रतिनिधी
दिंडनेर्ली येथील प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचा दूधगंगा प्रकल्पात समावेश करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे. या मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर जिह्यातील दूधगंगा नदीवर 25 टीएमसी चे धरण आहे. या धरणातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध गावांना पाणी दिले जाते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून जवळपास 60 हजार हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणले आहे. यापैकी दूधगंगा डावा कालवा करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावाजवळून जातो. कालव्याच्या वरच्या बाजूस असलेल्या पाच हजार हेक्टर क्षेत्रासाठी कालव्यावरून उपसा सिंचन योजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. या उपसा सिंचन योजनेमुळे येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
योजनेबाबत आठ वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. कृष्णा पाणी वाटप तंत्रानुसार महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा वापर करण्याच्या दृष्टीने दूधगंगा प्रकल्पाचे फेर नियोजन केल्यास दिंडनेर्ली उपसा सिंचन योजनेसाठी 0.80 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. हे पाणी आजूबाजूच्या बारा गावांच्या शेतीला ओलिताखाली आणण्यासाठी पुरेसे आहे. योजना मार्गी लागल्यास दिंडनेर्ली, हणबरवाडी, वडगाव, वड्डवाडी, गिरगाव, कोगील खुर्द, कोगील बुद्रुक, कणेरी, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, नंदगाव आणि जैताळ या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनेचा तातडीने विचार व्हावा आणि या योजनेला मंजुरी देऊन सर्वेक्षणाचे आदेश काढावेत, अशी मागणी माजी आमदार महाडिक यांनी केली आहे.