कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
स्पर्धेच्या युगात दहावी बारावीनंतर व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. धावपळीच्या जगात, व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू बनवतात. नोकरीच्या संधी वाढवतात, उद्योजकता विकसित करतात आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी दहावीनंतर शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआय, तर बारावीनंतर अभियांत्रिकी, मेडीकल, फार्मसी, फिजिओ थेरपा, एमबीए, एमसीए, बीबीए, कॉम्प्युटर सायन्स आदी विषयांच्या प्रवेशासाठी गर्दी होत आहे.
शिक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाला महत्व दिले जाते. त्यामुळे दर दहा वर्षांनी एका विषयात शिक्षण घेण्याची क्रेझ असते. दहा वर्षापुर्वी आयटीसह सीए होण्याचे फॅड विद्यार्थ्यांमध्ये होते. त्यामुळे संबंधीत विषयातील विषयतज्ञांची संख्या वाढल्याने नोकरीच्या संधी कमी झाल्याचे चित्र आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने स्वतंत्र व्यवसाय किंवा खासगी कंपनीत मोठया पॅकेजवर काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दहावी–बारावीनंतर लगेच नोकरीची संधी मिळावी अशीच विद्यार्थी व पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतन, पॅरामेडीकल यासारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. जेणेकरून लवकरात लवकर नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळावी. तर बारावीनंतर पदवी, अभियांत्रिकी, लॉ, फार्मसी, बीसीए, बीबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी, मेडीकल, एमबीबीएस, हॉटेल मॅनेजमेंट यासह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. कमी वेळेत जास्तीत जास्त आर्थिक फायदा आणि प्रतिष्ठा मिळवण्याकडे तरूणाईचा कल आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्मार्टवर्कसह स्वत:मधील कौशल्य विकसित केल्याने शिक्षण सुरू असतानाच प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून अनेकांना लाखो रूपयांचे पॅकेज मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेवून आपले करिअर सुकर करतात.
- बारावीनंतर कृषी महाविद्यालयाला प्राधान्य
कृषी महाविद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थी बारावीनंतर कृषी महाविद्यालय किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात. या दोन्ही शाखेतील विद्यार्थी युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होताना दिसत आहेत. या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यामुळे ज्यांचा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे आणि अभ्यास करण्याची तयारी आहे, अशा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवतात.
- परदेशी जाण्याचे प्रमाण वाढले
आपल्या पाल्याला अलीकडे एमबीबीएस, एमबीए, मेडीकल करण्यासाठी परदेशी पाठवणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी रशिया, युक्रेन, आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका आदी देशात जाताना दिसतात. त्यामुळे शिक्षणाबरोबर ज्या देशात जायचे तेथील बोली भाषाही विद्यार्थी शिकतात.
- व्यावसायिक अभ्यासक्रमांचे फायदे
व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधी मिळतात.
व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्ये विकसित करता येतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो, ज्यामुळे ते नवीन गोष्टी शिकण्यास तयार होतात.
व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक संबंध सुधारता येतात, ज्यामुळे ते अधिक सामाजिक होतात.
- एआयकडे विद्यार्थ्यांचा कल
दहा वर्षापुर्वी आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा ट्रेंड होता. सध्या दहावीनंतर तंत्रनिकेतनमधून कॉम्प्युटर सायन्सचा डिप्लोमा पूर्ण करून, पदवी अभियांत्रिकी शिक्षण ‘एआय’मध्ये घेवून एआयमध्ये करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.








