गवताला अन्य ठिकाणच्या बाजारपेठेमध्येही चांगल्या प्रमाणात मागणी
वार्ताहर /किणये
तालुक्यात शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करतात. या दुग्ध व्यवसायामुळे प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये दोन ते चार जनावरे आहेत. या जनावरांसाठी प्रथिने व प्रोटीनयुक्त चारा म्हणून नेपियर गवताचा वापर करण्यात येत आहे. तसेच या गवताला अन्य ठिकाणच्या बाजारपेठेमध्येही चांगल्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा कल नेपियर गवत लागवडीकडे वाढलेला आहे. सध्या हवामानाचे चक्र बदलत चालले आहे. शेती हा व्यवसाय बिनभरवशाचा व्यवसाय बनून राहिला आहे. त्यामुळे आता शेती करणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. जे शेतकरी शेतशिवारात काम करतात त्यांना मात्र हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीक पाण्याचा आधार घ्यावा लागतो आहे. असेच एक नेपियर (हत्ती गवत) शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचे साधन बनू लागले आहे. त्यामुळे या गवताच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील रणकुंडये, बहाद्दरवाडी, बेळवट्टी, सावगाव, संतीबस्तवाड, कुट्टलवाडी या गावातील काही शेतकऱ्यांनी नेपियर गवताची लागवड केली आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या काळ्या किंवा लालसर मातीच्या जमिनीमध्ये या नेपियर गवताची लागवड करता येते. यासाठी बेळगाव परिसरातील एका कंपनीकडून गवताच्या कांड्या मिळत आहेत. एकरी अकराशे डोळे असलेल्या कांड्या आवश्यक आहेत. त्यासाठी अकरा हजार रुपये इतका खर्च असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शिवारात नेपियर गवताची लागवड केल्यानंतर त्याला महिन्यातून तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागते.
एकरी 200 ते 250 टन गवत
लागवडीनंतर आंतरमशागत व जैविक खताचा डोस देण्यात येतो. नेपियर गवताच्या लागवडीनंतर पहिली कापणी चार महिन्यानंतर केली जाते. अशा एकूण वर्षाला चार ते पाच कापण्या होतात. यामुळे एकरी 200 ते 250 टन इतके नेपियर गवत मिळते. तसेच या गवताची खरेदी बेळगाव परिसरात एक कंपनी करणार आहे, अशी माहिती बेळवट्टी येथील विजय चौगुले यांनी दिली आहे.
नव्याने लागवडीचा प्रयोग केला आहे
रणकुंडये गावाजवळील शेतशिवारात यंदा नेपियर गवताची लागवड केली आहे. यापूर्वी या जमिनीमध्ये ऊस किंवा रताळी हे पीक घेत होतो. आता नेपियर गवत लागवडीचा प्रयोग केला आहे. या गवताच्या लागवडीसाठी मनुष्यबळ कमी लागते. मेहनतही कमी आहे. या गवतातून उत्पन्न चांगले मिळू शकते असे काही जणांनी सांगितले आहे. त्यामुळे या गवताची लागवड केली आहे.
– मारुती पाटील, शेतकरी बहाद्दरवाडी









