दोन दुचाकींसह सुमारे 12 लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. सरस्वतीनगर-गणेशपूर येथील चोरीच्या घटनेनंतर टिळकवाडी व होनियाळ येथेही घरफोड्या घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे 12 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. आजवर बंद घरांचा कडीकोयंडा तोडून चोरीचे प्रकार घडत होते. शांतीनगर टिळकवाडी येथील मुरग्याप्पा आप्पयाप्पा मुरली यांच्या घरात सर्वजण घरी असतानाच चोरी झाली आहे. मंगळवार दि. 15 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चोरीची ही घटना उघडकीस आली असून गुरुवारी 17 एप्रिल रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. मुरग्याप्पा घरी असतानाच त्यांना नकळत घरात शिरून बेडरूममधील ड्रॉवरमध्ये एका स्टीलच्या डब्यात ठेवण्यात आलेले सोन्याचे तोडे, मंगळसूत्र, कर्णफुले, बांगड्या, गंठण, लक्ष्मीहार असे 145 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविण्यात आले आहेत. जाता जाता घरासमोर उभी करण्यात आलेली केए 22 ईपी 9098 क्रमांकाची होंडा अॅक्टिव्हाही चोरट्यांनी पळविली आहे.
मुरग्याप्पा यांच्या घरातून 11 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पळविण्यात आला आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी पुढील तपास करीत आहेत. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस यांनी या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. दुसरी घटना होनियाळ येथील साई मंदिराजवळ घडली आहे. भारती नागाप्पा सोलबक्कन्नावर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आपल्या घराला कुलूप लावून भारती दोन मुलांसह खानापूर तालुक्यातील गुंडेनहट्टी येथील नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. गुरुवार दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता घरी परतल्या. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. बेडरूममधील कपाट फोडून ड्रॉवरमधील 15 ग्रॅम सोने व 610 ग्रॅम चांदी असे एकूण पाऊण लाखाचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शाहूनगरमधून मोटारसायकलची चोरी
शाहूनगर शेवटच्या बसस्टॉपजवळ असलेल्या समर्थ कॉलनीमधून हिरो स्प्लेंडर प्रो मोटारसायकलची चोरी झाली आहे. 10 एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी केए 23 ईएच 2946 क्रमांकाची घरासमोर उभी करण्यात आलेली मोटारसायकल पळविली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.









