बस्तवाड, बसवन कुडचीत तणावाची परिस्थिती
बेळगाव : बस्तवाड (ता. बेळगाव) येथील एका तरुणावर हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद बसवन कुडची येथे उमटले. हल्ल्यानंतर बसवन कुडची येथील एका घरावर दगडफेक करून त्या गावातील एका तरुणावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून हिरेबागेवाडी व माळमारुती पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे. त्यावेळी चाकूहल्ल्याची घटना घडली. या दोन घटनेतील हल्ल्यात एकूण तिघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास दर्शन बाहुबली बडची (वय 18) याला बस्तवाड येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ पैसे देण्याचे सांगून बोलावून घेऊन दगडाने त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नऊ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही प्रकरणात एकूण दहाजणांना अटक करण्यात आली आहे.
कबुतराच्या पैशाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तणाव वाढू नये म्हणून बस्तवाड येथे बंदोबस्त वाढविण्यात आला. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास या घटनेचे पडसाद बसवन कुडची येथे उमटले. अरिहंत कल्लाप्पा पाटील (वय 22) याच्यावर रॉडने मारहाण करण्यात आली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत. अरिहंतच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. पाठीमागचा दरवाजा फोडण्यात आला असून समोरच्या दरवाजावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनंतरचा तणाव लक्षात घेऊन बसवन कुडची व बस्तवाड या दोन्ही गावांत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून धरपकड सुरू ठेवण्यात आली आहे.









