बागायतमार्फत अनुदान : कमी खर्चात अधिक उत्पादन : जागेवरच पीक खरेदी : लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
बेळगाव : खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णता यावी, यासाठी बागायत खात्यामार्फत पामतेलाच्या उत्पादनासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. पारंपरिक तेलबियांच्या तुलनेत पामतेलाचे उत्पादन प्रतिहेक्टर सर्वाधिक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पौष्टिकता असलेल्या पामतेलाचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे. जिल्ह्यात 314 हेक्टर क्षेत्रात पामतेलाची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी अडीच हजार हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला होता. त्यामुळे भविष्यात पामतेल फळपीक म्हणून पुढे येईल, अशी आशा बागायत खात्याने केली आहे. रामदुर्ग, खानापूर, गोकाक, बैलहोंगल, चिकोडी यासह इतर ठिकाणी पामतेल झाडांची लागवड केली आहे. खाद्यतेलाची देशांतर्गत मागणी लक्षात घेऊन शासनाने पामतेल लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
50 टक्के अनुदानाची हमी
पामतेल उत्पादन कमी खर्चिक आहे. त्याचबरोबर साधारण 30 ते 35 वर्षे याचे उत्पादन होऊ शकते. विशेषत: बागायतमार्फत अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. डिझेल पंपसेट, ठिबक सिंचन, कूपनलिका खोदाई, पाणी साठविणे, गांडूळ युनिट, पामफळे काढण्यासाठी उपकरणे आदींसाठी 50 टक्के अनुदान दिले जात आहे. याबरोबरच चॉप कटर, ट्रॅक्टर ट्रॉली व फळझाडांसाठी लागवड विभागाकडून अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, अल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. खाद्यतेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी खात्यामार्फत विविध प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: शेतकऱ्यांना अनुदान देऊन प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे अलीकडे पामतेल झाडांच्या लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. दैनंदिन वापराबरोबर बिस्कीट, दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, बायोडिझेलसारख्या वस्तूंमध्येदेखील पामतेलाचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे मागणी वाढत आहे. खाद्यतेलाचे दर वाढू लागल्याने पामतेलाला अच्छे दिन येऊ लागले आहेत. विशेषत: शासनाकडून प्रतिटन 12,500 ऊ. हमीभाव जाहीर झाला आहे. त्याबरोबरच एक एकरात तब्बल 10 टनांपर्यंत याचे उत्पादन होऊ शकते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही पामतेल शेतकऱ्यांना फायदेशीर आहे.
शासनाने मंजूर केलेल्या 3इ ऑईल पाम कंपनीचा आधार
शासनाने मंजुरी दिलेली 3एफ ऑईल पाम कंपनी वेळोवेळी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदीदेखील केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समोरच वजन केले जाणार आहे. शिवाय थेट बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही बाजारपेठेत जाऊन विक्री करण्याचा त्रास उचलावा लागणार नाही. कंपनी प्रत्यक्षात जागेवरच पिकाची खरेदी करणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका बागायत खाते, बागायत अधिकारी किंवा रयत संपर्क केंद्रात संपर्क साधावा.
दीड वर्षानंतर उत्पादन सुरू
पामतेल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. याबाबत सर्वत्र जागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनी पामतेल लागवडीसाठी पुढे यावे. साधारण दीड वर्षानंतर याचे उत्पादन सुरू होते. शिवाय अंतर्गत संमिश्र पीक घेता येते. कमी खर्चिक असल्याने शेतकऱ्यांनी पामतेल झाडांची लागवड करावी.
-महांतेश मुरगोड, सहसंचालक, बागायत खाते









