या आठवड्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सर्व जगभरात साजरा केला जाईल. जवळ जवळ 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्ण मथुरेतील कंसाच्या कारागृहात अवतीर्ण झाले त्यानंतर त्यांच्याच इच्छेनुसार त्यांना गोकुळातील नंद महाराज आणि यशोदेच्या महालामध्ये स्थलांतरित करण्यात आले. यानिमित्त गोकुळामध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळींच्या सुखा । अंत पार नाहीं लेखा ।।1।। बाळकृष्ण नंदाघरिं। आनंदल्या नरनारी ।।2।। गुढिया तोरणे। करिती कथा गाती गाणी ।।3।। तुका म्हणे छंदे। येणे वेधिली गोविंदें ।।4।। अर्थात ‘श्रीकृष्ण जन्माच्या वेळी त्यांच्या दर्शनाने गोकुळातल्या सुखाला मर्यादाच राहिली नाही. बाळकृष्ण नंद आणि यशोदेच्या घरामध्ये प्रकट झाल्याने सर्व स्त्री-पुऊषांना आनंद झाला. गोकुळातील सर्वानी आपापल्या घरी गुढ्या उभारल्या, प्रवेशद्वारावर तोरणे बांधली आणि सर्वजण श्रीहरीचे गुणगान करू लागले. गोविंदाने गोकुळातल्या सर्वाना आपला छंद लावला आणि त्यांचे हृदय वेधून घेतले.
आणखी एका अभंगात श्रीकृष्णजन्माचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, फिरविली दोनी । कन्या आणि चक्रपाणी ।।1।। जाला आनंदी आनंद । अवतरले गोविंद ।।2।। तुटली बंधने । वसुदेव देवकीची दर्शने ।।3।। गोकुळासी आले । ब्रह्म अव्यक्त चांगले ।।4।। नंद दसवंती । धन्य देखीले श्रीपती ।।5।। निशी जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ।।6।। आनंदली माही । भार गेला सकळही।।7।। तुका म्हणे कंसा । आठ भोवला वळसा ।।8।। अर्थात ‘वसुदेवाने बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर त्याला तेथून गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेच्या घरी नेऊन ठेवले आणि तेथून यशोदेला झालेली कन्या घेऊन तो मथुरेला गेला. गोविंदाने देवकीच्या पोटी जन्म घेतला तेव्हा सर्वत्र आनंदी आनंद झाला. श्रीहरीच्या दर्शनाने वसुदेव देवकीच्या बेड्या तुटल्या. अव्यक्त असे परब्रह्म गोकुळात श्रीकृष्णाच्या रूपाने अवतरले. ज्या नंद आणि यशोदेने श्रीपतीला बालरूपात पाहिले ते धन्य होत. श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री गोपाळाचा जन्म झाला त्यावेळी पृथ्वी आनंदित झाली आणि तिचा सर्व भार हलका झाला. कंस मात्र चिंतेच्या भोवऱ्यात अडकला आणि बेचैन झाला.
भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा सामान्य माणसासारखा कर्मबंधनामुळे होत नाही. वास्तविक श्रीकृष्ण हे अजन्मा आहेत, त्यांचे शरीर सत्चितनंद आहे. सामान्य मनुष्यासारखे भगवंताचे शरीर हाडामांसाने बनलेले नाही. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला अवतीर्ण होणे असे म्हणतात. जेव्हा ते अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंग शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. भगवंताचे अवतीर्ण होणे आणि अप्रकट होणे हे आकाशात तळपणाऱ्या प्रखर सूर्याप्रमाणे आहे. सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटते की सूर्यास्त झाला आणि जेव्हा आपल्या डोळ्यासमोर प्रकट होतो तेव्हा सूर्योदय झाल्यासारखे वाटते. परंतु सत्य हे आहे की सूर्य एकाच ठिकाणी स्थिर असतो. पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो. हे समजण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वत:च आपल्या अवतीर्ण होण्याचे वर्णन भगवद्गीतेमध्ये करतात कारण तर्काने किंवा कल्पनेने त्यांचे या भौतिक जगात अवतीर्ण होणे सामान्य जीवांना कळणार नाही. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या श्लोकामध्ये आपल्या दिव्य अवताराबद्दल माहिती देतात. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् । प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया। (गीता 4.6) अर्थात ‘मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणिमात्रांच्या ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो.’ जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत: । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ।(गीता 4.9) अर्थात ‘जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुन, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो.’ अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ।(गीता 7.24) अर्थात ‘मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की, मी (पुऊषोत्तम भगवान श्रीकृष्ण) पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही.’ नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत:। मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।(गीता 7.25) अर्थात ‘मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगातील शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत’ अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् । (गीता 9.11) अर्थात ‘जेव्हा मी मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत’.
वरील काही श्लोकामध्ये आपल्या अवतारकार्याबद्दल सांगतात, त्याचप्रमाणे भगवंत एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे जरी दिसत असले तरी मूलत: भगवंत हे सर्व सृष्टीचे स्रोत आहेत आणि सर्व आध्यात्मिक आणि भौतिक प्रकृतीचे निर्माण आणि नियंत्रण करतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्वं प्रवर्तते । इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता:। (गीता 10.8) अर्थात ‘मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंत:करणपूर्वक मला भजतात. मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् । हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते (गीता 9.10) अर्थात ‘हे कौंतेय! माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो.’
सारांशाने सांगावयाचे झाल्यास भगवान श्रीकृष्ण ही साधारण व्यक्ती नाही आणि सर्वसाधारण व्यक्ती कधीही श्रीकृष्ण बनू शकत नाही. म्हणूनच सामान्य माणूस सहजपणे भगवान श्रीकृष्णांना समजण्यात गोंधळून जातो. अशा श्रीकृष्णांना केवळ त्यांच्यावर प्रेम करणारे शुद्ध भक्तच समजू शकतात. संत तुकाराम आपल्या काही अभंगातून अशा अद्भुत श्रीकृष्णाबद्दल म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी । हरी हा बालक नंदाघरिं ।।1।। नवल केव्हढे केव्हढे । न कळे कान्होबाचे कोडे ।।2।। पृथ्वी जेणे तृप्त केली। त्यासी यशोदा भोजन घाली ।।3।। विश्वव्यापक कमळापती । त्यासी गौळणी कडिये घेती ।।4।। तुका म्हणे नटधारी । भोग भोगूनि ब्रह्मचारी ।।5।। अर्थात ‘ज्याच्या उदरी अनंत ब्रह्मांडे स्थित आहेत, तो हरी नंदाच्या घरी एखाद्या बालकाप्रमाणे खेळत आहे ही केवढी नवलाची गोष्ट आहे, या कृष्णाचे लाघव कोणालाही समजत नाही. ज्याने सर्व पृथ्वी तृप्त केली, त्याला यशोदा आपल्या हाताने घास भरविते, जो कमळापती विश्वव्यापक आहे, त्याला गौळणी कडेवर घेतात. अशा या श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवात सर्वानी सहभागी होऊन गोकुळीचा आनंद कसा प्राप्त करावा याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ।।1।। होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ।।2।। सदा नाम वाचे गाती । प्रेमे आनंदी नाचती ।।3।। तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष।।4।। अर्थात ‘गोकुळात श्रीकृष्ण जन्मला हे ऐकून दुष्ट लोकांचा थरकाप उडाला. श्रीकृष्ण अवतीर्ण झाल्यावर सात्विक लोक घरोघरी उत्सव साजरा करू लागले, उच्च स्वरात श्रीकृष्णाच्या नामाचा गजर करू लागले आणि प्रेमानंदाने नृत्य करू लागले. जे हरिनामाची गर्जना करतात व आनंदाने नाचतात त्यांचे सर्व दोष निवारण होतात.
-वृंदावनदास








