केंद्राच्या 25 लाखाच्या निधीतून कचरा वर्गीकरण प्रकल्पाचे उद्घाटन
वार्ताहर/उचगाव
उचगाव ग्रा. पं.ने स्वच्छतेच्या बाबतीत चांगली मोहीम हाती घेतली असून, स्वच्छ आणि निर्मल गावाकडे नजर टाकताना इतर ग्रा.पं.नी या ग्रा.पं.चा आदर्श घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांच्या सुखसोयीसाठी गावात अनेक सुविधा ग्रा.पं.ने राबीवल्या आहेत. याबाबत मी ग्राम पंचायतचे मनापासून अभिनंदन करतो. आणि अशीच वाटचाल यापुढेही ग्रा.पं.ने करावी, अशा त्यांना शुभेच्छा देतो, असे मनोगत जि.पं. सीईओ राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. उचगाव येथील वैकुंठधाम येथील कचरा वर्गीकरण प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
उचगाव येथील वैकुंठधाम येथे जवळपास 25 लाखाच्या केंद्राच्या निधीतून उभारण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा नुकताच गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबररोजी पार पडला. या समारंभात राहुल शिंदे उद्घाटक या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. कार्यक्रमाला ता.पं. सीईओ प्रदीप सावंत याचबरोबर शासकीय अधिकारी बसवंत कडेमणी, काडाचे अध्यक्ष युवराज कदम, ग्रा.पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सर्व सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी कचरा वर्गीकरण प्रकल्पातील विविध मशीनचे पूजन आणि उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत पीडीओ शिवाजी मडिवाळ यांनी केले. तसेच यावेळी उपस्थितांचाही ग्रा.पं.तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रा.पं. माजी सदस्य बी. एस. होनगेकर, अशोक हुक्केरीकर, मधुकर जाधव, शरद जाधव, रामा कांबळे, मनोहर कदम, रामा कदम, बंटी पावशे, जावेद जमादार, यादो कांबळे, भारती जाधव, स्मिता खांडेकर, रूपा गोंधळी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार एल. डी. चौगुले यांनी मानले.









