श्रीक्षेत्र धर्मस्थळचे अधिष्ठाता वीरेंद्र हेगडे, खासदार मंगला अंगडी यांची प्रमुख उपस्थिती : महिलांची लक्षणीय सहभाग
वार्ताहर/उचगाव
श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना, जेसी ट्रस्ट यांच्या विद्यमाने नवीन नियोजन कार्यक्रम व 18501 स्वयंसहाय्यता संस्थांचे उद्घाटन व विविध सुविधांचे वितरण असा जिल्हास्तरीय संयुक्त समारंभ श्रीक्षेत्र धर्मस्थळचे अधिष्ठाता वीरेंद्र हेगडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी हुंचेनट्टी येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला. प्रारंभी हुंचेनट्टीच्या प्रवेशद्वारातून श्रीक्षेत्र धर्मस्थळचे अधिष्ठाता वीरेंद्र हेगडे यांची खास रथातून पुष्पवृष्टी करत ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. त्यांच्यासोबत खासदार मंगला अंगडी व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. व्यासपीठावर आल्यानंतर वीरेंद्र हेगडे यांच्या हस्ते स्वसहाय्य संस्थांचे उद्घाटन व विविध सुविधांचे दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वीरेंद्र हेगडे यांनी श्रीक्षेत्र धर्मस्थळच्या वतीने सुरू असलेल्या सुविधा व योजनांची माहिती देताना म्हणाले, बेळगाव जिह्यामध्ये श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेअंतर्गत आतापर्यंत 4 लाख 42 हजार 553 सेवा देण्यात आल्या आहेत. त्या सध्या सुरू असून यामध्ये खास करून ई श्रम कार्ड, पीएम दिशा डिजिटल साक्षरता मोहीम, आयुष्मान भारत, शेतकऱ्यांसाठी दोन कोटी किमतीची कृषी यंत्रसामग्री, आरोग्याची माहिती, स्वच्छता मोहीम, उद्योजकता ट्रेनिंग, गरीब कुटुंबांना नित्यपयोगी वस्तू, जनमंगल कार्यक्रमाअंतर्गत व्हीलचेअर्स, समुदाय भवन मंदिरासाठी दोन कोटी 42 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अशा अनेक विविध योजना धर्मस्थळ ग्रामविकास योजना व जेसी ट्रस्ट यांच्यावतीने राबविण्यात येतात. यामुळे आज सर्वसामान्य महिला देखील पै न पै जमा करत आपली खास बँक त्या बनवत आहेत. आणि त्याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन संसारामध्ये होत असल्याचे मत हेगडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला बेळगाव जिह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच महिला अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी धर्मस्थळच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.









