गृहिणींची पाण्यासाठी होणारी परवड अखेर थांबणार
आचरा प्रतिनिधी
आचरा देऊळवाडीसाठी नळपाणी योजना करावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या भागात नेहमीच पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत होते. आज आचरा देऊळवाडीसाठी ग्रामपंचायत स्तरावर निधी संकलित करून या विस्तृत भागाची पाण्याची असणारी मागणी पूर्ण होणार आहे. या नळपाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आचरा गावचे सरपंच जेरॉन फर्नांडिस ,उपसरपंच संतोष मिराशी, रुपेश पाटकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, चंद्रकांत कदम, अभय भोसले,जयप्रकाश परूळेकर, अभिजित सावंत, मंदार सांबारी, सुनील मयेकर, विजया मयेकर, प्रदीप चव्हाण, गोविंद राणे, राजू राणे, प्रकाश रेणुसे, सौमित्र राणे अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. आचरा देऊळवाडी भागातील पाण्याचे स्रोत फेब्रुवारी महिना अखेर घटत असत. या भागातील महिलांना दोन किलोमीटर वणवण करत दुसऱ्या भागातून पिण्याचे पाणी आणावे लागत होते . ही गरज ओळखून आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी यांनी विशेष मेहनत घेत ही नळपाणी योजना प्रत्यक्ष होण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. यावर्षी पाण्यासाठी भटकावे लागणार नसल्याने स्थानिक ग्रामस्थ, महिला यांनी समाधान व्यक्त केले आहे.









