स्वामी विवेकानंद स्मारकापासून तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत ब्रिज : 37 कोटी रुपयांचा खर्च
वृत्तसंस्था/ कन्याकुमारी
देशातील पहिला ग्लास ब्रिज तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर निर्माण करण्यात आला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद या ब्रिजचे उद्घाटन केले आहे. हा ब्रिज निर्माण करण्यात आल्याने पर्यटक आता कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरून विवेकानंद रॉक मेमोरियलपासून थेट 133 फूट उंच तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचू शकतात. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 37 कोटी रुपये खर्च केले आहेत.
ग्लास ब्रिजच्या खाली समुद्र आहे. या ब्रिजवर चालताना समुद्रावर चालत असल्यास आभास होतो. धनुष्याकृती आर्च ग्लास ब्रिजला किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांना सहन करण्याच्या दृष्टीकोनातून डिझाइन करण्यात आला आहे. या ब्रिजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन, उपमुख्यमंत्री उदयनिधी, राज्याचे मंत्री आणि खासदार कनिमोझी यांनी त्यावरून चालण्याचा आनंद घेतला आहे. तसेच त्यानंतर तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्यावर लेझर लाइट शोचे आयोजन करण्यात आले.
संत तिरुवल्लुवर यांचे 2 हजार वर्षांपूर्वी कन्याकुमारीत वास्तव्य होते असे स्थानिकांचे मानणे आहे. त्यांचा कन्याकुमारीच्या किनाऱ्यानजीक समुद्रात एका खडकावर मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या उभारणीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्टॅलिन सरकारने ग्लास ब्रिज प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. तर ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला विवेकानंद स्मारक असून ते 1970 मध्ये उभारण्यात आले होते. कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हजारो लोक येत असतात. ब्रिज उभारला जाण्यापूर्वी विवेकानंद स्मारकापासून तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी नौकेची मदत घेतली जात होती. परंतु आता पर्यटक पुतळ्यापर्यंत चालत जाऊ शकतात.









