पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणः गुजरात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
वृत्तसंस्था / भूज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातच्या कच्छ जिल्हय़ातील भूज येथे ‘स्मृतिवन’ स्मारकाचे उद्घाटन केले आहे. स्मृतिवन स्मारक हे 2001 च्या भूकंपादरम्यान जीव गमावलेल्या 13 हजार लोकांच्या स्मृतिप्रित्यर्थ निर्माण करण्यात आले आहे. हे स्मारक 470 एकरच्या क्षेत्रात फैलावलेले आहे. स्मारकात भूकंपात जीव गमाविणाऱया लोकांची नावे नमूद आहेत. तसेच यात एक अत्याधुनिक स्मृतिवन भूकंप संग्रहालय देखील आहे. तत्पूर्वीपंतप्रधान मोदींनी गुजरात दौऱयाच्या दुसऱया दिवशी भूजमध्ये 3 किलोमीटरपर्यंत रोड शोमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान पारंपरिक नृत्यासह लोकांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदींनी याचबरोबर जिल्हय़ातील 948 गावांमध्ये सिंचन तसेच पेयजल उपलब्ध करविणाऱया सरदार सरोवर प्रकल्पाच्या कच्छ शाखा कालव्याचेही लोकार्पण केले आहे. तसेच सरहद डेअरीच्या एका नव्या स्वयंचलित दूध प्रक्रिया अन् पॅकिंग प्रकल्पाचे, भूजमध्ये एक क्षेत्रीय विज्ञान केंद्र तर गांधीधाममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर तर अंजारमध्ये वीर बाल स्मारकाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. पंतप्रधानांनी त्यानंतर गांधीनगर येथी महात्मपा मंदिर संमेलन केंद्रात भारतात सुझुकी कंपनीच्या आगमनाला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केले आहे.

पंतप्रधान मोदींनी रविवारी गुजरातच्या कच्छ येथील अंजार शहरात ‘वीर बालक स्मारका’चे उद्घाटन केले आहे. 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमधील भूकंपात कच्छच्या अंजार शहरात एका रॅलीत भाग घेण्यासाठी पोहोचलेले 185 शालेय विद्यार्थी अन् 20 शिक्षक इमारतींच्या ढिगाऱयाखाली सापडून मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी या मुलांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या स्मारकाच्या उद्घाटन सोहळय़ात मृत मुलांच्या कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले होते.
26 जानेवारी 2001 रोजी सकाळी विध्वंसक भूकंप झाला, तेव्हा मी दिल्लीत होतो. भूकंपाचा प्रभाव दिल्लीतही दिसून आला होता, भूकंपाची माहिती कळल्यावर त्वरित गुजरातच्या दिशेने निघालो अन् दुसऱया दिवशी कच्छमध्ये पोहोचलो, तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, भाजपचा एक कार्यकर्ता होतो. किती लोकांना मदत करू शकेन हे मला तेव्हा माहित नव्हते. परंतु दुःखाच्या क्षणात लोकांसोबत उभा राहणार हे ठरविले होते. लोकांना शक्य तितकी मदत करण्याचा निश्चय केला होता. त्यानंतर अचानक मला गुजरातचा मुख्यमंत्री करण्यात आले. तेव्हा येथे करण्यात आलेल्या कार्याचा अनुभव अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मोदींनी म्हटले आहे.
संकट संधीत रुपांतरित
भूकंपाने प्रचंड नुकसान घडविल्याने भूज कधीच पुन्हा उभे राहू शकणार नसल्याचे लोक म्हणत होते. परंतु या आपत्तीला संधीत रुपांतरित करू असे मी म्हटले होते. तुम्हाला जो रण दिसतो, त्या रणात मला भारताचे तोरण दिसते असे मी भुजवासीयांना उद्देशून म्हटले होते. मी जे काही म्हटले होते, ते आता सत्य म्हणून सर्वांच्या नजरेसमोर आहे. लाल किल्ल्यावरून बोलताना मी 2047 मध्ये भारत विकसित देश होणार असल्याचे सांगितले होते आणि ते होणारच असे उद्गार मोदींनी काढले आहे.









