अक्कमहादेवी महिला सहकारी बँकेचे विलीनीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
शिरोळ तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनतेपासून उद्योजकांपर्यंत अर्थवाहिनी असलेली डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँक यशस्वी वाटचाल करीत आज मल्टिस्टेटचा दर्जा प्राप्त केल्याने आणखी जोमाने कार्य करण्याची ऊर्जा निर्माण होत आहे. खासगी सावकाराकडून जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी. शेतकरी, कष्टकरी, कामगार, छोटे व्यावसायिक यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उदात्त हेतूने आदरणीय सा. रे. पाटील यांनी बँकेची स्थापना केली.
उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सांगली, कोल्हापूरमध्ये 15 शाखांसह यशस्वी वाटचाल करत असतानाच बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा प्राप्त झाला. आणि बेळगाव (कर्नाटक) येथील अक्कमहादेवी महिला सहकारी बँक नियमित बेळगाव या बँकेचे आज आपल्या बँकेत विलीनीकरण झाले. यानिमित्ताने मल्टिस्टेट शाखेचा शुभारंभ 11 जुलै 2022 रोजी करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक महादेव राजमाने यांनी केले. त्यानंतर गणपतराव पाटील, शंकर मांगलेकर, ए. बी. पाटील (माजी मंत्री कर्नाटक राज्य) या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता खालील मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री ए. बी. पाटील, अक्कमहादेवी महिला बँकेच्या चेअरमन मीनाक्षी पाटील, वीरशैव बँकेचे माजी कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर, कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक नाना कदम, दत्त कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिल यादव, विनया घोरपडे, बँकेचे चेअरमन महादेव राजमाने, व्हाईस चेअरमन महेंद्र बागे, इंद्रजित पाटील, संचालक दामोदर सुतार, रमेश पाटील, मफत पाटील, प्रमोद पाटील, संजय पाटील, शेखर पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक कदम, जनार्दन बोटे मॅनेजिंग डायरेक्टर, मिलिंद जगदाळे असि. जनरल मॅनेजर तसेच दत्त साखरचे संचालक, बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









