बेळगाव : बेळगावमध्ये सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थी येत आहेत. त्यांना अधिवेशनाचे कामकाज कसे चालते, हे पहाण्याची संधी मिळत आहे. त्याचबरोबर त्यांचे मनोरंजनही व्हावे या हेतूने विधानसौधच्या आवारामध्ये अधिवेशन काळापुरते ‘रॉक क्लायबिंग’ या खेळाचा लाभही त्यांना देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी ही माहिती दिली. युवा सबलीकरण व क्रीडा विभागातर्फे उभारलेल्या या ‘रॉक क्लायबिंग’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कामकाज पाहण्यासाठी शेकडो विद्यार्थी येत आहेत. त्यांना बाहेर उन्हात तिष्ठत ठेवण्यापेक्षा अशा उपक्रमांकडे वळविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशन कामकाज पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही घटना स्मरणीय ठरणार आहे. त्यांच्यासाठी पाणी, सरबत देण्यात येत आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. आजची मुले ही उद्याचे भविष्य असल्याने त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण व्हावे यासाठीच प्रयत्नशील
युवा सबलीकरण व क्रीडा विभागाचे सचिव बी. नागेंद्र यांनी राज्यात क्रीडा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘रॉक क्लायबिंग’ हा क्रीडा प्रकार ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट झाला आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण व्हावे व त्यांनी या क्रीडा प्रकाराकडे वळावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. याप्रसंगी सभापती बसवराज होरट्टी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी व विद्यार्थी उपस्थित होते.









