वृत्तसंस्था /भुवनेश्वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडीशामध्ये अनेक विकास प्रकल्पांच्या कायाला आरंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकंदरीत खर्च 68 हजार कोटी रुपयांचा आहे. आयआयएम संबळपूर येथील 400 कोटी रुपये खर्चाचा विद्यापीठ परिसर प्रकल्प तसेच विविध क्षेत्रांसाठीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. ऊर्जानिर्मिती, रेल्वे आणि मार्गनिर्माण संबंधी हे प्रकल्प आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरी-सोनेपूर-पुरी या साप्ताहिक रेल्वेगाडीचा प्रारंभ केला आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. तसेच त्यांनी जरसूगुडा मुख्य टपाल विभागाच्या वास्तूचे राष्ट्रीय सांस्कृतित वारसा म्हणून राष्ट्रर्पण केले. या शिवाय त्यांनी 412 किलोमीटर लांबीच्या धामरा-अंगुल पाईपलाईनचे उद्घाटन केले. ही पाईपलाईन जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धामरा पाईपलाईनचा एक भाग आहे. या पाईपलाईनमधून नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम यांची वाहतूक होणार आहे. या प्रकल्पाचा एकंदर खर्च 2,450 कोटी रुपयांचा आहे.
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाला ओडीशाचे राज्यपाल रघुवरदास, मुख्यमंत्री नवीन पटनाईक, त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री, विविध विभागांचे सरकारी अधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. ओडीशा राज्याचा मोठ्या प्रमाणात स्थानिक जनसमुदाय उपस्थित होता.









