बेळगाव : केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्यावतीने प्रथमवर्ष इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा ‘प्रयोग वर्ष 2023 व अविन्या वर्ष 2023’ या प्रकल्प प्रदर्शनाचे शुक्रवार दि. 22 रोजी उद्घाटन झाले. प्रथमवर्ष विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सर्वोत्तम प्रकल्पांचे त्यांनी कौतुक केले. केएलई इंजिनीअरिंग कॉलेजने विद्यार्थ्यांना आपल्या संकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ दिले असून विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांकडून 116 प्रकल्प सादर
एकूण 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी 37 संघांद्वारे 116 प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या सोयीसाठी लायब्ररी मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांची यादी शोधणे सोयीचे होणार आहे. कॉलेजचे विद्यार्थी महम्मद पटेल व धिराज इचलकरंजी यांनी डॉ. सतीश तोटार, डॉ. डी. ए. तोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅप तयार केले आहे. यावेळी प्रा. एस. बी. कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.









