प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर, खासबाग, वडगाव परिसरामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत. ते दरवषीच विसर्जनादिवशी भव्य मिरवणूक काढत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र यावषी सर्व निर्बंध मागे घेण्यात आले. याचबरोबर कोरोना कमीही झाला आहे. त्यामुळे भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहापूर विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावषी मोठय़ा उत्साहाने विसर्जन मिरवणूक काढून बाप्पांना पुढीलवषी लवकर या, अशी हाक देत जड अंतःकरणाने बाप्पांना निरोप दिला.
ढोल-ताशा, डीजे यासह भजन, कीर्तनाच्या माध्यमातून ही मिरवणूक काढण्यात आली. शहापूर परिसरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विविध आकर्षक मूर्तींची प्रति÷ापना करत असतात. यावषीही त्यांनी पारंपरिक पद्धतीने मूर्तींची प्रति÷ापना केली होती. तब्बल दहा दिवस पूजाअर्चा तसेच विविध कार्यक्रम आयोजित करून गणेशोत्सव साजरा केला.
शुक्रवारी दुपारी गणेश मंडपांमध्ये लिलावाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 7 च्या दरम्यान काही मंडळांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव मंडळांना विविध प्रकारचे आवाहन केले होते. त्यानुसार ही मिरवणूक पार पडली.
खासबाग येथील व्यापारी बंधू, बसवेश्वर सर्कल रोड, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती सायंकाळी 5 वाजताच बाहेर काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन शहापूर विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
शहापूर, खासबाग परिसरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. ही सर्व मंडळे मोठय़ा उत्साहाने आणि अत्यंत शांततेत मिरवणूक काढत कपिलेश्वर तलाव येथे मूर्तींचे विसर्जन करतात. नाथ पै सर्कल येथे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडपाची उभारणी करून त्याठिकाणी मिरवणुकीत सहभागी होणाऱया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे स्वागत केले.
यावेळी व्यापारी बंधू बसवेश्वर सर्कल रोड खासबागचे अध्यक्ष दिनेश मेलगे, नगरसेवक रवी साळुंखे, माजी उपमहापौर संजय शिंदे, अमृत भागोजी, दशरथ शिंदे, दिलीप दळवी, मंडळाचे सेपेटरी विनोद कोळीवाड, कृष्णा हलगेकर, महेश शिंदे, श्रीधर जाधव, सुमंत जाधव, सुभाष शिन्नोळकर, महेश बामणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मुस्लीम-हिंदू बांधवांनी केली गणेशाची पूजा
नवी गल्ली, शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडविले. गेली 25 वर्षे ही परंपरा या मंडळाने जोपासली आहे. सर्व बेळगावसह संपूर्ण राज्याला एक वेगळा आदर्श दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गेली अनेक वर्षे हिंदू व मुस्लीम एकत्र राहून आम्ही सण साजरे करत आहोत. हिंदूंच्या सणामध्ये मुस्लीम बांधव येत असतात तर मुस्लीम बांधवांच्या सणांमध्ये हिंदू सहभागी होतात.
यावेळी नेताजी जाधव म्हणाले, या मंडळाने जपलेल्या आदर्शाचे यापूर्वी कौतुक झाले आहे. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख हेमंत निंबाळकर यांनी या मंडळाचा गौरव केला होता. अत्यंत शांततेत एकत्रपणे गणेशोत्सव साजरा आजपर्यंत केल्याचे त्यांनी सांगितले. शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनिलकुमार एच. यांनी या मंडळाचा आदर्श संपूर्ण राज्याने घ्यावा, मुस्लीम आणि हिंदू बांधव एकत्रपणे सण साजरा करत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मिरजाभाई उपस्थित होते. आम्ही हिंदू-मुस्लीम एकत्र येवून एकोपाने सण साजरा करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला सादीक कोतवाल, नजीर मुल्ला, अब्दुल बागलकोटी, रेहमान मिरजाभाई, मुनाफ रायबागी, दावलसाब नायकवाडी, साहीब कलमोडी, नझीर मुल्ला, मोहम्मद कटांबली, अमजत मोमीन यांच्यासह मुस्लीम बांधव व नगरसेवक रवी साळुंखे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









