कोल्हापूर सर्कलनजीक आयोजन : पाच दिवस चालणार प्रदर्शन
बेळगाव : गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या विकास कामांची माहिती छायाचित्राच्या माध्यमातून नागरिकांना देण्यासाठी पाच दिवशीय छायाचित्र प्रदर्शन कोल्हापूर सर्कल जवळील माहेश्वरी अंध शाळेजवळील इनडोअर स्टेडियममध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार मंगल अंगडी, खासदार इराण्णा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय संपर्क खाते धारवाड आणि जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती आणि जनसंपर्क खाते, आरोग्य खाते, शिक्षण खाते, कृषी खाते, महिला आणि बालकल्याण व युवजन सबलीकरण आणि क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून नागरिकांच्या हिताला अनुसरुन अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आल्या आहेत. बदलत्या काळानुसार देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात बदल घडवून आणला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, अशा अनेक क्षेत्रा आमुलाग्र प्रगती केली आहे. बदलत्या काळानुसार आपण बदललो नाही तर कडेला लोटले जाऊ, याची जाणीव असल्यानेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक विकास कामे राबवून देशाचे नाव जगामध्ये उज्ज्वल केले आहे, असे खासदार इराणा कडाडी यांनी सांगितले. यावेळी जलजीवन योजना, आरोग्य, कृषी, महिला आणि बालकल्याण खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचे प्रदर्शन मांडले आहे. तर केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती छायाचित्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. याचे निरीक्षण उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, आरोग्य, कृषी, महिला आणि बालकल्याण आदी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









