जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा पुढाकार
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला शिक्षण आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच उच्च दर्जाच्या सुविधा देण्यास नेहमीच पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण कायम कार्यतत्पर आहोत, असे जिल्हा पालकमंत्री व बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी येथे नूतन सरकारी आयटीआय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करून ते बोलत होते. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण व सर्वांगिण विकासाला उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. या भागातील विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक शिक्षण घेण्यासाठी हे प्रशिक्षण महाविद्यालय अत्यंत उपयोगी ठरणार आहे. शैक्षणिक सुविधांसाठी नेहमीच पुढाकार घेऊन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दृष्टीनेच 2 कोटी निधीतून ही इमारत उभारली आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन अधिक ज्ञान मिळून तांत्रिक शिक्षण सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या आयटीआय महाविद्यालयामध्ये सध्या 40 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे. भविष्यात अधिक विद्यार्थ्यांना औद्योगिक शिक्षण घेण्यास सोयीचे व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. सतीश जारकीहोळी फौंडेशनकडून या भागातील शाळा, महाविद्यालये, संघ-संस्थांना आवश्यक मदत देऊन सहकार्य केले जात आहे. यापुढेही हे कार्य सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर यमकनमर्डी ग्रा. पं. व्याप्तीतील विविध विकासकामांना चालना देण्यात आली. यावेळी हत्तरगी सरकारी आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र जेन्ड्राळे, महादेवी पाटोळी, ईरण्णा बिसीरोट्टी यांच्यासह हत्तरगी, यमकनमर्डी ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









