नवीन वास्तूत स्थलांतर : सात वर्षांत धनदुप्पट ठेव योजनेचा प्रारंभ
बेळगाव : शेतमजूर, अल्पभूधारक, लहान व्यावसायिक यासह इतर लहान-सहान घटकांना धनश्री मल्टीपर्पज सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक आधार दिला जात आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांच्या दैनंदिन गरजा भागू लागल्या आहेत. शिवाय सहकार चळवळीमुळे समाज झपाट्याने पुढे येऊ लागला आहे. सर्वसामान्यांनी सोसायटीवर नितांत विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला जपत सोसायटीने सर्वसामान्यांचे नाते अधिक समृद्ध केले आहे, असे उद्गार कोल्हापूर येथील सीए सुनील नागावकर यांनी व्यक्त केले. अनगोळ रोड येथील धनश्री मल्टिपर्पज क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ रविवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, चेअरमन शिवाजी पावले, व्हाईस चेअरमन नितीन येतोजी, संचालक जी. जी. कानडीकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. संचालिका सोनल खांडेकर यांनी स्वागत केले. संचालक संजीव जोशी यांनी परिचय करून दिला. यावेळी महांतेश कवटगीमठ म्हणाले, सहकार क्षेत्राने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना वेगळी दिशा दिली आहे. सहकार चळवळीचे क्षेत्र झपाट्याने वाढले असून सर्वसामान्य लोकांना आर्थिक हातभार दिला आहे. धनश्री सोसायटीचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थेने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे. चेअरमन शिवाजी पावले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेने 31 वर्षांत विविध उपक्रम राबवून सर्वसामान्यांना मदतीचा हात पुढे केल्याची माहिती दिली. दि धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सहकारी सोसायटी लि. अनगोळ रोड यांच्या कार्यालयाचे नूतन इमारतीत रविवारी स्थलांतर झाले. या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ग्राहकांसाठी अवघ्या सात वर्षांत दामदुप्पट योजना राबविली आहे. यावेळी संचालक जगदीश बिर्जे, अर्जुन कोलकार, गोपाळ गुरव, गोपाळ होनगेकर, आप्पाजी पाटील, संचालिका सविता मोरे, सचिव आणि कर्मचारी, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









