न्हावेली / वार्ताहर
मळेवाड म्हापसेकरवाडी येथील नूतन अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
गेले कित्येक वर्ष मळेवाड म्हापसेकरवाडी अंगणवाडीला स्वतंत्र हक्काची इमारत नव्हती.या अंगणवाडीत शिकणारी मुलं ही कुणाच्या घरात तर कुणाच्या शेतमांगरात सुरू असलेल्या अंगणवाडीत शिकत होती.शेवटच्या टप्प्यात ही अंगणवाडी कुलदेवता विद्या मंदिर मळेवाड शाळा नंबर 2 च्या इमारतीत सुरू होती.मात्र सरपंच मीनल पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे यांनी अंगणवाडीच्या नूतन इमारती करिता स्वतंत्र निधी मिळण्यासाठी प्रयत्न करुन निधी उपलब्ध करुन म्हापसेकरवाडी अंगणवाडीतील मुलांसाठी हक्काची इमारत उभी केली.या इमारतीचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांनचे युवराज तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.यावेळी लखमराजे यांच्या हस्ते या अंगणवाडीसाठी विना मोबदला जमीन देणाऱ्या सुहासिनी मेस्त्री व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.तसेच इतर दानशूर व्यक्ती व मदत करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना माझी सरपंच लाडोबा केरकर यांनी नवीन इमारत झाल्याने मुलांना आता हक्काची इमारत प्राप्त झाली त्याबद्दल अभिनंदन करत मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच सरपंच मिलन पार्सेकर यांनीही शुभेच्छा देत असताना मुलांना भविष्यासाठी लागणारी शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या. युवराज लखमराजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना मळेवाड गाव हा आम्हाला आपला गाव वाटतो. या गावाप्रती आमचे प्रेम आहे.या गावातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असून या गावातील शैक्षणिक कार्यातही संस्थांनकडून वेळोवेळी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.तसेच मळेवाड म्हापसेकरवाडी अंगणवाडी करिता शुभदा देवी भोसले यांच्याकडून मुलाना बेंच देण्याचे आश्वासन दिले.गावात विनाशकारी प्रकल्प,मायनिंगला शेतकऱ्यांनी जमिनी देऊ नका. जमिनी ह्या तुमच्या हक्काच्या आहेत त्या विकू नका असेही आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित ग्रामस्थांना केले.उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रस्ताविक व आपलं मनोगत व्यक्त करत असताना ही अंगणवाडी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व अधिकारी वर्गाचे,ग्रामस्थ,जमीनदार तसेच लोकप्रतिनिधींचे आभार मानले.गावाचा विकास करत असताना जागा असणे अतिशय महत्त्वाचे असते आणि ही अंगणवाडी होण्यासाठी विना मोबदला जागा देणाऱ्या मेस्त्री कुटुंबीयांचे मराठे यांनी आभार मानले.त्यांचा आदर्श इतरांनी घेतल्यास गावाचा आणखीन विकास होऊ शकतो असे मत व्यक्त केले.ग्रामपंचायतच्या वतीने युवराज लखमराजे भोसले यांना भेटवस्तू,शाल व श्रीफळ व सुपारी रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे,कविता शेगडे, अर्जुन मुळीक,अमोल नाईक,मधुकर जाधव,स्नेहल मुळीक,गिरीजा मुळीक,महेश शिरसाट,ग्रामसेवक सोमा राऊळ,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,तंटामुक्ती अध्यक्ष तथा चेअरमन प्रकाश पार्सेकर, अंगणवाडी सेविका,आशा,मदतनीस, महिला सीआरपी,पालक, ग्रामस्थ,विकास सोसायटीचे संचालक,बीट हवालदार केरकर आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.









