बेळगाव : ‘नादस्पर्श म्युझिक फाउंडेशन’ या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेचा उद्घाटन समारंभ गुऊवार दि. 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे होणार आहे. दृष्टिहीन कलाकारांसाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या औपचारिक उद्घाटन आणि संगीत कार्यक्रमाला ‘ब्र्रेल मॅन ऑफ इंडिया’ या नावाने प्रसिद्ध असलेले मुंबईचे स्वागत थोरात आणि बेळगाव संगीत कलाकार संघाचे अध्यक्ष नंदन हेर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बेळगावचे प्रख्यात कलाकार संतोष पुरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या नादस्पर्श म्युझिक फाउंडेशनच्या उद्घाटनावेळी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. साताऱ्याचे हणमंत कुडाळकर यांचे स्वतंत्र तबला वादन आणि विजयपूरच्या कृत्तिका जांगीनमठ यांचे बासरी वादन होईल. संगीत रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून दृष्टिहीन कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात येत आहे. या कार्यक्रमातील कलाकार कृत्तिका जांगीनमठ या पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्या असून त्यांचे गायनाचे शिक्षण प्रारंभी पं. चन्नवीर बन्नूर आणि पं. चंद्रशेखर पुराणिकमठ यांच्याकडे झाले. त्या मुंबई विद्यापीठातून सध्या पीएचडी करत आहेत. आकाशवाणीच्या बी उच्च श्रेणीच्या त्या कलाकार असून आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हणमंत नारायण कुडाळकर हे वाई येथे राहणारे तबला वादक असून वडील नारायण कुडाळकर यांच्याकडून त्यांनी प्रारंभिक शिक्षण घेतले. तबला विशारद पदवीप्राप्त हणमंत हे सध्या वामनराव मिरजकर यांच्याकडून मार्गदर्शन मिळवत असून अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. हार्मोनियम साथ करणारे प्रणय बेलेकर हे कोल्हापूर जिह्यात राहणारे असून त्यांनी पुणे विद्यापीठातून संगीतात एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. सी.सी.आर.टी.ची शिष्यवृत्ती मिळविलेल्या प्रणय यांना उत्तम संवादिनी आणि सिंथेसायझर वादक म्हणून प्रसिद्धी लाभली आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या ऋतुजा बेलेकर या शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. पदवीधारक असून जयसिंगपूर येथे लीना पालकर यांच्याकडून संगीत शिक्षण घेत आहेत. नादस्पर्श म्युझिक फाउंडेशनची कल्पना प्रत्यक्षात आणणारे संतोष पुरी हे बेळगावातील नावाजलेले संगीतकार असून विश्वनाथ हुदलीकर, पंडित बसवराज भेंडिगेरी, पंडित हयवदन जोशी आणि विनायक नाईक यांच्याकडून त्यांनी तबल्याचे शिक्षण घेतले आहे. डॉ. सुधांशु कुलकर्णी यांच्याकडून हार्मोनियम आणि संजय देशपांडे यांच्याकडून सतारीचे धडे घेतले आहेत. गायनाचा अभ्यास त्यांनी महेश कुलकर्णी यांच्याकडून घेतला आहे. रोटरी क्लबच्या शिक्षक भूषण पुरस्कारासह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.









