प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) कॉलेजच्या सिव्हिल इंजिनियर विभागातर्फे मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरीचे उद्घाटन करण्यात आले. फॉसरॉक केमिकल्स इंडिया प्रा.लि.च्या सीएसआर फंडातून ही सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली असून सिव्हिल इंजिनियर विभागातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक उपयोग होणार आहे. बेंगळूर येथील फॉसरॉक कंपनीचे महाव्यवस्थापक शंकर कोट्टूर यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांना कौशल्य मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्था व इंडस्ट्रीने एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम राबविले पाहिजेत, असे ते म्हणाले.
सिव्हिल इंजिनियर विभागप्रमुख डॉ. वैभव चाटे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढवण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयोगशाळा महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले. प्रा. डी. ए. कुलकर्णी यांनी जीआयटी कॉलेजमध्ये दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. तसेच फॉसरॉक कंपनीचे आभारही मानले.









