मडगाव : मडगाव शिमगोत्सव समितीचे कार्यालय स्पायसी हॉटेलच्या नजीक उघडण्यात आले असून त्याचे उद्घाटन मंगळवारी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व इतर मान्यवर हजर होते. सदर शिमगोत्सव समितीत आमदार कामत हे अध्यक्ष, तर आमदार तुयेकर हे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार दामोदर नाईक सचिव आणि नगराध्यक्ष शिरोडकर हे खजिनदार आहेत.
सदर कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पिंपळकट्टय़ावर नारळ ठेऊन श्री दामबाबाचा आशीर्वाद घेण्यात आला. ही 1988 साली स्थापन करण्यात आलेली जुनी शिमगोत्सव समिती असून आपण सदर समितीचे सलग चार वर्षे अध्यक्ष असताना हे कार्यालय घेण्यात आले होते. त्यावेळी फातोर्डाचे तत्कालीन आमदार दामोदर नाईक हे सचिव, तर उल्हास रेडकर हे खजिनदार होते, याची आठवण कामत यांनी करून दिली. मडगावात शनिवार 18 मार्च रोजी शासकीय शिमगोत्सव मिरवणूक होणार आहे. यावेळी मडगावातून झालेल्या कार्निव्हल मिरवणुकीला जसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसाच तो शिमगोत्सव मिरवणुकीलाही लाभून सदर मिरवणूक यशस्वी होईल, असा विश्वास आमदार कामत यांनी व्यक्त केला. मिरवणुकीच्या जोडीला समितीकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात येतील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उद्घाटनापूर्वी सदर शिमगोत्सव कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली तसेच त्यात होम-हवन आदी विधी करण्यात आले, अशी माहिती नगराध्यक्ष शिरोडकर यांच्याकडून देण्यात आली.









