एकजुटीने रमाकांत कोंडुस्कर यांना विजयी करण्याचा कार्यकर्ते-मतदारांचा निर्धार
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. तरुणांची फौज याचबरोबर म. ए. समितीचे सर्व कार्यकर्ते एकत्रपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचा विजय होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. डबल रोड खासबाग येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर बोलत होते. व्यासपीठावर रमाकांत कोंडुस्कर, दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, बी. ओ. येतोजी, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक रतन मासेकर, उत्तर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर, निवड समितीचे अध्यक्ष नेताजी जाधव, युवा समितीचे शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. प्रारंभी बी. ओ. येतोजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उमेदवार रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, गरीब जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी मला संधी द्या. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी जनतेवर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. ते अत्याचार दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकजुटीने समितीच्या पाठीशी थांबून अन्याय दूर करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे स्वागत नेताजी जाधव यांनी केले. महादेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर किरण धामणेकर यांनी आभार मानले. यावेळी माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, मधुश्री पुजारी, माजी नगरसेवक विजय भोसले, मनोहर हलगेकर, दिनेश राऊळ, सुधा भातकांडे, प्रकाश अष्टेकर, राजू पावले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









