वार्ताहर /माशेल
गणेशनगर खांडोळा माशेल ‘लक्ष्मी नारायण हॉल’ या नवीन सभागृहाचे उद्घाटन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते नुकतेच झाले. उद्घाटन सोहळय़ाला जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच विशांत नाईक, पंचसदस्य मनोज गावकर तसेच सभागृहाचे मालक सुभाष बर्वे व प्रसाद बर्वे हे उपस्थित होते.
मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते फित कापून व दीप प्रज्ज्वलीत करुन या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. सभागृहाला शुभेच्छा देताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले, हल्ली लग्नकार्य व इतर समारंभासाठी सुसज्ज असे सभागृह सहसा उपलब्ध होत नाही. सभागृहाची उपलब्धता पाहूनच समारंभ ठरवावे लागतात. माशेल व खांडोळा भागाचे झपाटय़ाने नागरीकरण होत असल्याने सभागृह ही लोकांसाठी एकप्रकारची सेवा बनली आहे. सुभाष व प्रसाद बर्वे यांनी प्रशस्त व सुसज्ज असे सभागृह उभारुन समाजाची गरज भागविली आहे.
श्रमेश भासले म्हणाले, बर्वे बंधू यांनी कष्ट व जिद्दीने एका नवीन व्यावसायात पाऊल ठेवले आहे. कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सभागृह हा एक उत्तम व्यावसाय होऊ शकतो हे वाढत्या मागणीमुळे सिद्ध झाले आहे. सुभाष बर्वे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी तर प्रसाद बर्वे यांनी आभार मानल. कार्यक्रमाला बर्वे कुटुंबियांचे नातेवाई, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते. त्यांनी या नवीन सभागृहाला शुभेच्छा दिल्या.









