आरोग्यवर्धक शुद्ध शाकाहारी-मांसाहारी जेवणाची अल्पदरात सोय
बेळगाव : येथील कपिलेश्वर कॉलनीत मेनरोडवरील कपिलकुंज इमारतीत मंगळवार दि. 26 रोजी केएसबी हॉटेल व रेस्टॉरंटचे उद्घाटन बडेकोळमठ तारीहाळचे प. पू. शिवयोगी सद्गुरु नागेंद्र स्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रबोधनकार शंकरराव बांदकर होते. गायिका कविता सुतार यांनी ईशस्तवन म्हटले. प्रास्ताविक व स्वागत इंजिनियर, डेव्हलपर कृष्णा बस्तवाडकर यांनी केले. दीपप्रज्वलन शिवयोगी सद्गुरु नागेंद्र स्वामीजी, प्रबोधनकार शंकरराव बांदकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य सुळगे (ये.) अरविंद पाटील, अरविंद अष्टेकर, अॅड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. कृष्णा बस्तवाडकर, कुशल बस्तवाडकर, भारती बस्तवाडकर यांनी पाहुण्यांचा पानविडा, श्रीफळ, शाल व पुष्पहार देऊन सन्मान केला. नगरसेविका नेत्रावती भागवत यांनी फीत कापून पहिल्या मजल्याचे उद्घाटन केले. दुसऱ्या मजल्याचे उद्घाटन नगरसेवक राजू भातकांडे यांनी केले. नागेंद्र स्वामीजांनी सत्यनारायण पूजनाचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांची पाद्यपूजा कृष्णा बस्तवाडकर, भारती बस्तवाडकर व जयश्री गोडसे यांनी केली.
स्वामीजींना पुष्पहार, फळांची टोपली, शाल, श्रीफळ, पानविडा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेविका नेत्रावती भागवत, नगरसेवक राजू भातकांडे, अॅड. अण्णासाहेब घोरपडे यांनी बस्तवाडकर कुटुंबीयांच्या उपक्रमाचा गौरव करून सदिच्छा दिल्या. शंकरराव बांदकर म्हणाले, मनात लोकसेवेचा हेतू ठेवून बस्तवाडकर यांनी हाती घेतलेले हे कार्य त्यांना यश मिळवून देईल. हॉटेल-रेस्टॉरंट लोकसेवेचे साधन म्हणून माफक दरात जेवण थाली उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. मालक कृष्णा बस्तवाडकर व कुटुंबीयांचा शिवयोगी नागेंद्र स्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा बस्तवाडकर म्हणाले, निश्चित ध्येय ठेवल्यास गरिबी ही अडचण येऊ शकत नाही. हॉटेल-रेस्टॉरंटचा उपक्रम समाजसेवेसाठीच हाती घेतला आहे. येथे घरगुती, आरोग्यवर्धक अल्पदरात जेवण देणार आहे. शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळणार आहे. ग्राहकच देव मानून काम करणार आहोत. तीन मजली सुसज्ज इमारतीत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यावेळी इमारत कामगार व सिव्हिल इंजिनियर कुशल यांचाही सन्मान करण्यात आला. बी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी प्रताप देसाई व पूजा देसाई, सुनील चव्हाण, राहुल कनगुरकर, बसवराज हणमंतगोळ, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, मालन घोरपडे, स्मिता कुंडेकर, जयश्री भातकांडे उपस्थित होते.









