सातारा/प्रतिनिधी
भारत सरकारच्या रसायन व खत मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने तसेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी ६०० प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन दूरदृष्टी प्रणाली द्वारे म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
सातारा जिल्ह्यात म्हसवडकर एजन्सी सातारा यांच्या वतीने या सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास कृषी विभागातील विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. तसेच हा सर्व कार्यक्रम अनेक मान्यवरांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून अनुभवला. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा परिषद कृषी विस्तार अधिकारी विजय माईंणकर, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड प्रभारी योगेश वेंगुर्लेकर , ज्येष्ठ उद्योजक व मार्गदर्शक बच्चुभाई शहा, म्हसवडकर एजन्सीचे मालक शशांक भाई शहा यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे हस्ते दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत या ६०० किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन झाल्यानंतर सातारा येथील या किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक बच्चुभाई शहा व गुरुदत्त काळे यांचे शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्षेत्रीय प्रभारी योगेश वेंगुर्लेकर यांची एकाच छताखाली ही सर्व साधने शेतकरी बंधूंसाठी उपलब्ध करण्याची संकल्पना अतिशय कौतुकास पात्र ठरणारी आहे, असे मत व्यक्त केले.