भविष्यात शाश्वत ऊर्जेचे महत्त्व वाढणार : सिंगापूर येथील शैक्षणिक सल्लागार डॉ. दीपक वायकर यांचे मत
बेळगाव : पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, ऊर्जा सुरक्षा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शाश्वत ऊर्जेचे महत्त्व वाढणार आहे. ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सुधारणेलाही वाव मिळणार आहे, असे मत सिंगापूर येथील शैक्षणिक सल्लागार व ट्रेनोप्रेन्युअर डॉ. दीपक वायकर यांनी व्यक्त केले. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज येथे एनकॉन-23 (आयईईई) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, मार्च-23 पर्यंत भारतात एकूण 237.2 जीडब्ल्यू इतकी थर्मल ऊर्जा उपलब्ध झाली आहे. त्यापैकी 57.7 टक्के औष्णिक ऊर्जा कोळशापासून व अन्य ऊर्जा लिग्नाईट, डिझेल आणि वायुपासून मिळते. केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ग्रीन एनर्जी कॉरिडॉर व अक्षय ऊर्जेला महत्त्व दिले आहे. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक शाश्वत ऊर्जेकडे आपल्याला वाटचाल करावी लागेल, असेही ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे बेंगळूरच्या आयआयआयटीबीचे संचालक डॉ. देवव्रत दास यांनीही आयईईईच्या कार्याची माहिती दिली. यू. आर. राव सॅटेलाईट सेंटरचे प्रमुख पुनितकुमार मिश्रा यांनीसुद्धा अभियांत्रिकीमध्ये कलेचा सहभाग या विषयावर मांडणी केली. अभियंते हे निर्मितीक्षम असणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर त्यांनी अभियांत्रिकीला कलेची जोड देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले केएलई कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष एस. सी. मेटगुड यांनी केएलई संस्थेचा इतिहास सांगून शिक्षण, आरोग्य आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात संस्थेने केलेल्या कार्याची माहिती दिली. या परिषदेच्या चेअरपर्सन डॉ. कृपा रासने यांनी परिषदेचे सूत्र ‘द आर्ट ऑफ इंजिनिअरिंग, मास्टरिंग, इनोव्हेशन अँड इमॅजिनेशन’ असल्याचे सांगून विद्यार्थी, विचारवंत, अभियंता, उद्योजक, कारखानदार यांना एकाच व्यासपीठावर आणून विचारांची व संकल्पनांची देवाणघेवाण व्हावी, या हेतूने परिषद भरविल्याचे सांगितले. प्रारंभी साक्षी गुडरे•ाr यांनी स्वागतगीत सादर केले. शेषगिरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. नयना हुलकांतीमठ व डॉ. स्वाती माविनकत्तीमठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राखी कळ्ळीमनी यांनी आभार मानले.









