70 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटी आयएमईआर आयोजित योग दिनाचे औचित्य साधून योग स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. आयएमईआरच्या सभागृहात खुल्या योग स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरु मुरलीधर प्रभू, पोलीस उपनिरीक्षक हरीष के. एल., आयएमईआरचे चेअरमन आर. एस. मुतालिक-देसाई, डायरेक्टर डॉ. आरिफ शेख, योग तज्ञ विनायक कोनगी, क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रीक्स आदी मान्यवर उपस्थित होते. या सदर स्पर्धेत आंतरशालेय व खुल्या विभागात जवळपास 70 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पदक विजेता विनायक कोनगी यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.
त्याने आतापर्यंत 47 राष्ट्रीय व 15 आंतरराष्ट्रीय पदके पटकाविली आहेत. आंतरशालेय मुला-मुलींच्या व खुल्या गटात पुरुष, महिला व खास पोलीस खात्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी मुरलीधर प्रभू म्हणाले, योगमुळे माणसाचे शरीर सदृढ व निरोगी बनते. लहानपणापासूनच योगासनाचे धडे गिरविले पाहिजे. सध्याच्या धगधगत्या जीवनात वेळ मिळत नाही. त्यातच आपला वेळ काढून योगाचे प्रकार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनाचे मोठे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात योगासनाचे वर्ग स्थापून अनेक योगतज्ञ तेथील स्थानिकांना मार्गदर्शन करीत आहेत. या संधीचा लाभ सर्वांनी घेऊन आपले शरीर निरोगी बनवावे, असे ते म्हणाले. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शुक्रवारी स्पर्धेनंतर बक्षीस वितरण होणार आहे.









