जीर्णोद्धारित माउलीदेवी मंदिरामुळे लौकिकात भर : उद्घाटन सोहळय़ास भाविकांची अलोट गर्दी
वार्ताहर /गुंजी
येथील सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री माऊली देवी मंदिराचे उद्घाटन थाटात पार पडला. दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. सोमवारी सकाळी कुमारिका पूजन होऊन मंदिरात पूर्णाहुती व धार्मिक कार्यक्रम झाले. तालुक्मयाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन, जोतिबा रेमाणी यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन तर माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते गर्भगुढीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. निंबाळकर यांनी मंदिर जीर्णोद्धार कार्याची स्तुती केली. सामाजिक एकोपा आणि सहकार्याची सांगड मिळाल्यास कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यास वेळ लागणार नाही. गुंजी गावच्या या एकमेव गुणामुळेच भव्य दिव्य मंदिर उभारले गेले. जनसागर पाहून देवीच्या लौकिकतेची जाणीव होते, असे उद्गार काढले. देवीच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष राजाराम देसाई होते. खेमाण्णा घाडी यांनी प्रास्ताविक करून मंदिर जीर्णोद्धाराच्या घडामोडींची माहिती दिली. स्वागतानंतर देणगीदार व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. निंबाळकर, मृणाल हेब्बाळकर, शंकर गावडा, सतीश कुलकर्णी, नारायण कापोलकर, लक्ष्मी घाडी आदींची भाषणे झाली. माजी आमदार दिगंबर पाटील, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील, जोतिबा रेमाणी, एस. एस. निंगाणी एसीएफ दांडेली विभाग, बाळासाहेब शेलार, मनोहर बोरकर, नरहरी नाईक, दीपक देसाई, यशवंत बिरजे, प्रेमानंद गुरव, ऍड. महादेव पाटील, पत्रकार प्रकाश देशपांडे, विवेक गिरी, वासुदेव चौगुले, रमेश धबाले, शकील हुदली, महेश कोडोळी, मोहनराव केशकामत, गंगाधर जी., संजय नांदे, अनंत जांभळे, अनंत हंगिरगेकर, प्रकाश गावडे, राजू पवार, फॉरेस्टर, राजू सिद्धाणी, किशन चौधरी, सुभाष घाडी, संतोष गुरव, सायनेकर, प्रकाश चव्हाण, शिवाजी घाडी आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन जोतिबा बिरजे व मल्हारी करंबळकर यांनी तर आभार दीपक देसाई यांनी मानले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
या उद्घाटन सोहळय़ास भाविकांची अलोट गर्दी झाली होती. जवळ जवळ दहा-बारा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. देवीचे दर्शन घेऊन ओटी भरली. दर्शन आणि उद्घाटन सोहळय़ास यात्रेचे स्वरुप आले होते.









