5 हजार 200 कोटींची गुंतवणूक ः वीज क्षेत्र विस्तारण्यावर भर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 5,200 कोटींहून अधिक एनटीपीसी प्रकल्पांची पायाभरणी केली. यासोबतच त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सौर रुफटॉप पोर्टलही लॉन्च केले. याप्रसंगी ऊर्जा आणि वीज क्षेत्र पुढील 25 वर्षांत भारताच्या प्रगतीला गती देण्यासाठी मोठी भूमिका बजावेल, असा अशावाद प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला.
व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी ऊर्जा क्षेत्राची ताकद खूप महत्त्वाची आहे. आठ वर्षांपूर्वी देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रत्येक केंद्र बळकट करण्याची आणि परिवर्तनाची जबाबदारी आपल्या सरकारने स्वीकारली होती. वीजेची व्यवस्था करण्यासाठी आम्ही चहुबाजूंनी एकत्र काम सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच आपल्या देशात मोठय़ा प्रमाणात वीज वाया जाते. वीज वितरण आणि पारेषणादरम्यान होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यांमध्ये आवश्यक गुंतवणूक का होत नाही, याकडे खूप लक्ष देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.









